जियो प्लॅटफॉर्म : 8 टक्के हिस्सेदारीची होणार विक्री
नवी दिल्ली :
रिलायन्स इंडस्ट्रिजमधील सहकारी कंपनी जियो प्लॅटफॉर्म यांनी आपली 8 टक्के इतकी वैयक्तिक हिस्सेदारी विक्री करण्याची योजना आखली आहे. यासाठी कंपनी 13 मोठ्या विदेशी गुंतवणूकदारांशी चर्चा करत असल्याचे समजते. येणाऱ्या काळामध्ये जियो प्लॅटफॉर्मचा आयपीओ सादर केला जाणार असून त्यासंदर्भातल्या तयारीला कंपनीने वेग दिला आहे.
रिलायन्स जियोच्या ग्राहकांची संख्या पाहता जगभरामध्ये दुसऱ्या नंबरची मोठी टेलिकॉम कंपनी ठरली आहे. पहिल्या क्रमांकावर चायना मोबाइल राहिली आहे. येत्या आठवड्यामध्ये जियो प्लॅटफॉर्म आयपीओकरता आपली रीतसर कागदपत्रे बाजारातील नियामक सेबीकडे सादर करू शकते, अशीही माहिती पुढे येते आहे.
दिग्गजांची गुंतवणूक
जियो प्लॅटफॉर्ममध्ये पाहता मोठमोठ्या गुंतवणूकदारांची हिस्सेदारी आहे. यामध्ये मेटा, गूगलसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. मेटाची हिस्सेदारी 9.99 टक्के इतकी तर गुगलची हिस्सेदारी 7.73 टक्के आहे. यासोबतच गल्फमधील तीन सॉवरेन फंडस् जसे की पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड, मुकाबला आणि अबुधाबी इन्वेस्टमेंट यांनी सुद्धा जियो प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक केली आहे.