जिओ पेमेंट्स बँकेची नवीन सुविधा
आता क्यूआर स्कॅन करुन मिळणार रोख
वृत्तसंस्था/मुंबई
जिओ पेमेंट्स बँक लिमिटेडने युपीआयद्वारे कार्डशिवाय रोख रक्कम काढण्याची सुविधा सुरू करून डिजिटल बँकिंग आणि आर्थिक समावेशनाला नवीन चालना देणार असल्याची माहिती आहे. जिओ पेमेंट्स बँक लिमिटेडने डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याच्या आणि सर्वसामान्यांपर्यंत आर्थिक सेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने एक नवीन सुविधा सुरू केली आहे. आता ग्राहक बिझनेस करस्पॉन्डंट टच पॉइंट्सद्वारे युपीआय आधारित रोख रक्कम काढू शकतील. या सुविधेअंतर्गत, ग्राहकांना रोख रक्कम काढण्यासाठी डेबिट कार्डची किंवा एटीएम मशीनची गरज भासणार नसल्याची माहितीही यावेळी कंपनीने दिली.
जिओ पेमेंट्स बँक ही जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची उपकंपनी आहे आणि हा उपक्रम त्यांच्या डिजिटल बँकिंग नेटवर्कला मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिला जात आहे. यामुळे विशेषत: ग्रामीण आणि निमशहरी भागांतील लोकांना, जिथे बँकिंग सुविधा मर्यादित आहेत, त्यांना मोठी सोय मिळण्याची अपेक्षा आहे. या उपक्रमाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो डिजिटल पेमेंट आणि रोख रकमेची उपलब्धता यामधील दरी कमी करतो. आतापर्यंत रोख रकमेवर अवलंबून असलेले अनेक लोकही हळूहळू डिजिटल माध्यम स्वीकारण्यास प्रोत्साहित होतील. तसेच, ज्या भागात एटीएमची उपलब्धता कमी आहे किंवा बँकेच्या शाखा दूर आहेत, तिथे ही सुविधा प्रभावी ठरू शकते.