डेटा वापरण्यात ‘जिओ’ जगात भारी
डेटा ट्रॅफिक वापरामध्ये चीनच्या कंपन्यांना मागे टाकत बनली जगातील सर्वात मोठी कंपनी
मुंबई :
दूरसंचार क्षेत्रातील देशातील प्रमुख कंपनी रिलायन्स जिओने सांगितले की, डेटा ट्रॅफिक वापराच्या बाबतीत चीनच्या कंपन्यांना मागे टाकून जगातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे.
दरम्यान कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘दरडोई डेटा वापर दरमहा 30.3 जीबीपर्यंत वाढला आहे, म्हणजे दररोज एक जीबीपेक्षा जास्त. यासह, डेटा ट्रॅफिकच्या बाबतीतही जिओ जगातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. रिलायन्स जिओच्या जून तिमाहीच्या आकडेवारीनुसार, डेटा वापर 32.8 टक्क्यांनी वाढून 44 अब्ज गीगाबाइट्स (जीबी) वर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत 33.2 अब्ज जीबी होता.
कंपनीची एकूण ग्राहकसंख्या जवळपास 49 कोटींवर पोहोचली आहे, ज्यात 13 कोटी 5जी वापरकर्त्यांचा समावेश आहे, असे निवेदनात म्हटले आहे. यासह जिओ 5जी सेवांच्या बाबतीत चीन वगळता सर्वात मोठी कंपनी बनली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत कंपनीच्या नेटवर्कवर व्हॉईस कॉलिंगने 1,420 अब्ज मिनिटांची विक्रमी पातळी गाठली आहे, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत सहा टक्के जास्त आहे.
स्वस्त इंटरनेट हा इंडियाचा डिजिटल कणा : आकाश अंबानी
रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी म्हणाले, ‘गुणवत्तेचे उच्च कव्हरेज, परवडणारे इंटरनेट हा डिजिटल इंडियाचा कणा आहे आणि त्यात योगदान दिल्याचा जिओला अभिमान आहे. आमचे नवीन ‘प्रीपेड प्लॅन्स’ 5जी आणि एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) क्षेत्रात नाविन्य आणतील आणि त्याचा लाभ अनेक क्षेत्रांना घेता येईल. कपंनी नेहमीच ग्राहकाला प्राधान्य देते. ‘ग्राहक प्रथम’ दृष्टिकोनासह, जिओ त्याच्या सुधारित नेटवर्क आणि नवीन सेवा ऑफरच्या आधारे बाजारपेठेतील नेतृत्वाची स्थिती आणखी मजबूत करेल.’