जिओ, एअरटेल, व्हीआयची शुल्कवाढ योग्यच
दूरसंचार नियामक ट्रायचे स्पष्टीकरण : दरवाढ मनमानी नसल्याचे मत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तीन खासगी क्षेत्रातील दूरसंचार ऑपरेटर-रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया (व्हीआय) यांनी 3 ते 4 जुलै दरम्यान शुल्क वाढवले होते. सदरची वाढ ही योग्यच असल्याचा खुलासा ट्रायकडून करण्यात आला आहे. शिवाय, दरवाढ ही काही मनमानी नाही किंवा ग्राहकांची पिळवणूकही नाही असेही म्हटले आहे.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने संपूर्ण उद्योगातील अलीकडील दरवाढीची तपासणी पूर्ण केली आहे आणि या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहे. ही वाढ अधिक वाजवी आहे आणि ती ग्राहकांचे शोषण करत नाही.
टेलिकम्युनिकेशन टॅरिफ ऑर्डर (टीटीओ), 1999 नुसार, सेवा प्रदात्यांनी दूरसंचार सेवांसाठी कोणतेही नवीन शुल्क किंवा त्यात कोणतेही बदल झाल्यास प्राधिकरणाला त्याच्या अंमलबजावणीच्या तारखेपासून सात कामकाजाच्या दिवसांच्या आत सूचित करणे आवश्यक आहे. या शुल्कांची पारदर्शकता, गैर-शोषण आणि गैर-भेदभाव या तत्त्वांसह नियामक तत्त्वांचे पालन करण्यासाठी तपासणी केली जात असल्याचेही स्पष्टीकरण दिले आहे.