जिओ, एअरटेल, व्हीआय आणि बीएसएनएलला दंड
ट्रायकडून स्पॅम कॉल-मेसेजेस रोखण्यात अयशस्वी झाल्याबद्दल 141 कोटींची दंड आकारणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्राय यांनी दूरसंचार कंपन्यांमध्ये रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया (व्हीआय) आणि बीएसएनएल यांना स्पॅम कॉल आणि संदेश रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल दंड ठोठावला आहे.
चार मोठ्या कंपन्यांशिवाय अनेक छोट्या टेलिकॉम ऑपरेटरनाही ट्रायने दंड ठोठावला. ट्रायने टेलिकॉम कमर्शियल कम्युनिकेशन कस्टमर प्रेफरन्स रेग्युलेशन (टीसीसीसीपीआर) अंतर्गत सर्व कंपन्यांना हा दंड आकारला आहे. ताज्या आकडेवारीनुसार ट्रायने सर्व कंपन्यांना एकूण 12 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
एकूण 141 कोटी रुपयांचा दंड
पूर्वीच्या दंडाला जोडून, टेलिकॉम कंपन्यांवरील एकूण दंड 141 कोटीचा आहे. मात्र, कंपन्यांनी अद्याप ही थकबाकी भरलेली नाही. ट्रायने दूरसंचार विभागाला (डीओटी) कंपनीची बँक गॅरंटी रोखून पैसे वसूल करण्याची विनंती केली आहे, परंतु याबाबत दूरसंचार विभागाचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे.
टीसीसीसीपीआरचे उद्दिष्ट
टीसीसीसीपीआरची स्थापना 2010 मध्ये करण्यात आली. त्याचा उद्देश ग्राहकांना स्पॅम कॉल्स आणि संदेशांपासून संरक्षण करणे हा आहे. टीसीसीसीपीआरच्या कार्यांमध्ये ग्राहकांना प्रचारात्मक सामग्री अवरोधित करण्याचा पर्याय, टेलिमार्केटरसाठी आवश्यक नोंदणी, प्रचारात्मक संप्रेषणांवर वेळेचे बंधन आणि नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड यांचा समावेश आहे.
दूरसंचार कंपन्यांनी बँका, व्यवसायांना स्पॅम नियम लागू करावेत
दूरसंचार कंपन्यांनी ट्रायला व्हॉट्सअॅप सारख्या ओव्हर-द-टॉप (ओटीटी) प्लॅटफॉर्मवर तसेच बँका आणि इतर व्यवसायांवर स्पॅम नियम लागू करण्याची विनंती केली आहे.