For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिंदल कंपनीकडून गॅस टर्मिनलचे काम सुरू, दगाबाजीच्या आरोपावरुन वातावरण तापणार?

02:00 PM Apr 23, 2025 IST | Snehal Patil
जिंदल कंपनीकडून गॅस टर्मिनलचे काम सुरू  दगाबाजीच्या आरोपावरुन वातावरण तापणार
Advertisement

कंपनीकडून दगाबाजी, ग्रामस्थांचा आरोप, तीव्र आंदोलनाचा इशारा

Advertisement

रत्नागिरी : नांदिवडे ग्रामस्थांकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनाची दखल घेऊन जिंदल कंपनीने गॅस टर्मिनलचे काम स्थगित करत असल्याचे लेखी आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. मात्र, सोमवारी कंपनीने तहसीलदारांना पत्र सादर करत प्रकल्पाचे काम थांबविणे अशक्य असल्याने मंगळवारपासून गॅस टर्मिनलच्या कामाला सुरुवात करत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या प्रकाराने संतप्त झालेले नांदिवडे ग्रामस्थ व प्रदुषण विरोधी संघर्ष समितीने कंपनीवर दगाबाजी केल्याचा आरोप केला आहे. तसेच 25 एप्रिल नंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

जिंदल कंपनी येथील गॅस टर्मिनल हटविण्यात यावे यासाठी नांदिवडे ग्रामस्थ व प्रदुषण विरोधी समिती यांच्याकडून 14 एप्रिल पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. आंदोलनाला मिळणारा पाठिंबा लक्षात घेता कंपनीकडून गॅस टर्मिनलचे काम स्थगित करत असल्याचे लेखी आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. तसेच 25 रोजी ग्रामस्थ व कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांची एक सभा घेण्यात येईल. यानंतर पुढील निर्णय घेऊ असेदेखील कंपनीकडून ग्रामस्थांना सांगण्यात आले होते.

Advertisement

ग्रामस्थांना आश्वासन दिले असतानाही कंपनीकडून 21 एप्रिलला रत्नागिरी तहसीलदारांना एक पत्र पाठविण्यात आले. त्यानुसार ग्रामस्थांकडून करण्यात येत असलेल्या आंदोलनप्रकरणी सद्भावनेच्या दृष्टीने प्रकल्पाचे काम स्थगित करत असल्याचे कळविले होते. मात्र प्रकल्पाशी निगडीत बाबींमुळे गॅस टर्मिनलचे काम बंद ठेवणे अवघड व अशक्य झाले आहे. त्यामुळे 22 एप्रिल पासून पुन्हा एकदा स्थगित केलेल्या कामाला सुरुवात करण्यात येत आहे असे कळविले आहे.

गॅस टर्मिनलचे काम पुन्हा एकदा सुरू झाल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. कंपनीकडून 25 तारखेला वरिष्ठ अधिकारी व ग्रामस्थ यांच्यात सभा घेण्याचे आश्वासन दिले होते. तोपर्यंत कामाला स्थगिती राहील असे लेखी आश्वासन दिले होते. असे असतानाही, तीन दिवस आधी कंपनीकडून परस्पर काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे एकप्रकारे ग्रामस्थांसोबत कंपनीने दगाबाजी केली आहे असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.

25 एप्रिलनंतर तीव्र आंदोलन छेडणार

कंपनीने दिलेल्या आश्वासनानुसार 25 एप्रिल रोजी ग्रामस्थ व कंपनीचे अधिकारी यांच्यातील सभेकडे लक्ष लागले आहे. या सभेत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास माजी मंत्री बच्चु कडू यांच्या पाठिंब्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रदुषण विरोधी समितीकडून देण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.