जिमी कार्टर यांचे 100 व्या वर्षी निधन
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष : नोबेल शांतता पुरस्कारानेही गौरवित
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले आहे. रविवारी त्यांचे अमेरिकत वृद्धापकाळाने निधन झाले. अमेरिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासात ते सर्वाधिक आयुष्य प्राप्त केलेले राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. भारताशी त्यांचे विशेष संबंध होते. त्यांनी 1978 भारताचा दौरा केला होता. त्यावेळी भारतात काँग्रेसची सत्ता जाऊन जनता पक्ष सत्तेवर आला होता.
1976 ते 1980 या काळात ते अमेरिकेचे डेमॉक्रेटिक पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांच्या माता लिलियन कार्टर यांनी 1960 च्या दशकात शांतता अभियानाच्या अंतर्गत भारतात आरोग्य स्वयंसेविका म्हणून काम केले होते. जिमी कार्टर यांना 2002 मध्ये नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
भारताच्या खेड्याला भेट
भारताच्या दौऱ्यावर असताना जिमी कार्टर यांनी 3 जानेवारी 1978 या दिवशी हरियाणातील दौलतपूर नसीराबाद या खेड्याला भेट दिली होती. त्यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी रोझेलिन याही होत्या. हे गाव दिल्लीच्या जवळ आहे. त्यांच्या भेटीचा गावकऱ्यांना इतका आनंद झाला होता, की त्यांनी नंतर या गावाचे नाव ‘कार्टरपुरी’ असे ठेवले. त्यांच्या भेटीचा 3 जानेवारी हा दिवस आजही या गावात साजरा केला जातो आणि गावाला त्या दिवशी सुटी असते.
भारत-अमेरिका दृढीकरणाचा प्रारंभ
स्वतंत्र भारताला भेट दिलेले जिमी कार्टर हे अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांच्या भारतदौऱ्यापासूनच भारत आणि अमेरिका यांच्यातील निकटच्या सहकार्याला प्रारंभ झाला, असे मानण्यात येते. तो पर्यंत भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध केवळ औपचारिक होते. सांप्रतच्या काळात भारत हा अमेरिकेचा विश्वासू भागीदार देश म्हणून ओळखला जातो. आज ऊर्जानिर्मिती, संरक्षण, मानवता साहाय्य, तंत्रज्ञानाचे आदानप्रदान, अवकाश संशोधन सहकार्य, समुद्री सुरक्षा, आपत्कालीन साहाय्यता, दहशतवादविरोध आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात दृढ सहकार्य निर्माण झाले आहे. या संबंधांची पायाभरणी जिमी कार्टर यांच्या त्या भारत दौऱ्याने केली, असे मानण्यात येते.
गणतंत्र हा सेतू
भारत आणि अमेरिका यांच्यात गणतंत्र हा समान धागा आहे. गणतंत्र हा सेतू असून त्यामुळे दोन्ही देश एकमेकांशी सांधले जाऊ शकतात. याच त्यांच्या संकल्पनेच्या आधारावर आज भारत आणि अमेरिका यांचे संबंध बळकट झाले आहेत. भारताशी घनिष्ट संबंध विकसीत करण्यावर कार्टर यांनी भर दिला होता. त्यांच्या काळात भारत आणि अमेरिका यांच्यात अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य प्रस्थापित झाले होते. भारताचे महत्व ओळखणारे अमेरिकेचे प्रथम राष्ट्राध्यक्ष हे जिमी कार्टरच आहेत, अशी धारणा त्यावेळी निर्माण झाली होती. विशेषत: ऊर्जा क्षेत्रात भारताशी अमेरिकेचे निकटचे सहकार्य त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळातच सुरु झाले होते.
दिल्ली घोषणापत्र
जिमी कार्टर यांच्या भारत दौऱ्यात दिल्ली घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होता. त्यावेळी मोरारजी देसाई हे भारताचे नेते होते. दोन्ही देशांच्या प्रशासनांना लोकमूल्यांच्या आधारावर एकमेकांशी सहकार्य करावे लागेल, असे प्रतिपादन त्यावेळी जिमी कार्टर यांनी केले होते. भारत आणि अमेरिका यांच्यात असे सहकार्य घोषणापत्र प्रथमच करण्यात आले होते. 2 जानेवारी 1978 या दिवशी त्यांचे भारताच्या संसदेसमोर भाषण झाले होते. त्या भाषणात त्यांनी एकाधिकाशाहीला विरोध करताना भारताने लोकशाहीची पुनर्स्थापना केल्यामुळे भारतीयांचे अभिनंदन केले होते. भारताच्या आजच्या समस्या सर्व विकसनशील देशांमध्ये अनुभवास येतात. त्या दूर करण्यासाठी दोन्ही देशांनी सहकार्याने प्रयत्न केले पाहिजेत. हे सहकार्य गणतंत्रीय मार्गानेच होऊ शकते. एकाधिकारशाहीच्या माध्यमातून नव्हे, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या त्या भाषणात केले होते.