भाकरीची थाप अन् भाविकांची उत्स्फूर्त दाद!
हिंदूनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा झुणका-भाकर देण्याचा उपक्रम
बेळगाव
कष्टाची बरी भाजी-भाकरी
तूप-साखरेची चोरी नको
असे संत वचन आहे. आपला देश कृषिप्रधान देश आहे. अर्थातच बळीराजाला आपल्या कृषी संस्कृतीनेही महत्त्व दिले आहे. हा बळीराजा कष्ट करून आपले पोट भागवणारा आहे. आज जरी भाकरी महाग झाली तरी पूर्वापार काळापासून भाकरी-भाजी हे कृषिप्रधान संस्कृतीचे मुख्य अन्न मानले गेले. हाच धागा लक्षात घेऊन टिळकवाडी, हिंदूनगर येथील राणा प्रताप रोडवरील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दरवर्षी गणेशोत्सवात एक दिवस प्रसाद म्हणून झुणका-भाकर देण्याचा उपक्रम अनेक वर्षांपासून राबवत आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा मूळ हेतूच सर्वांनी एकत्र यावे हा आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने मंडळातील कार्यकर्ते एकत्र येतातच, परंतु महिला वर्गाचा यामध्ये पुढाकार असतो. साधारण पाच-सहाच्या दरम्यान महिला एकत्र येऊन शेगड्या पेटवितात आणि भाकऱ्या करण्यास सुरुवात करतात. दरवर्षी या उपक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर गणेश दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला झुणका-भाकरीचा प्रसाद देण्यात येतो.
महिला भाकऱ्या तयार करतात आणि कार्यकर्ते वाटप करतात. रात्री उशिरापर्यंत हे काम अखंडपणे सुरू राहते. शेवटचा भाविक प्रसाद घेऊन गेल्यानंतरच हे काम थांबते. यासाठी मंडळातर्फे तांदळाचे पीठ पुरविले जाते. तसेच झुणक्याचे साहित्यही दिले जाते. आपल्या घरातील सर्व काम पूर्ण करून भाकरीसाठी बसणाऱ्या महिलांचा उत्साहसुद्धा अपूर्व असतो. यंदा या मंडळाने झुलता पूल उभारल्याने गणेशभक्तांची गर्दीही वाढत आहे. हा सर्व उपक्रम मंडळाची कार्यकारिणी आणि कार्यकर्ते यशस्वी करतात.