झुंजवाड रस्त्याची पावसामुळे पुन्हा दैना
पाणी भरल्याने ठिकठिकाणी डबक्याचे स्वरूप : त्वरित दुरुस्तीची मागणी
वार्ताहर/नंदगड
खानापूर-यल्लापूर राज्य मार्गादरम्यान झुंजवाड (के. एन.) गावाजवळ खड्डे पडले होते. गेल्या आठवड्याभरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे त्या खड्यांचा आकार वाढला आहे. त्यात पावसाचे पाणी भरल्याने ठिकठिकाणी डबक्याचे स्वरूप आले आहे. खानापूर-यल्लापूर राज्यमार्गाची दुरुस्ती 2008 साली करण्यात आली होती. त्यानंतर रस्त्यावर पडलेल्या लहान लहान खड्यांची दुरुस्ती करण्यात आल्याने तब्बल 14 वर्षे रस्ता सुस्थितीत होता. परंतु गेल्या वर्षभरापासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर वाढत्या पावसामुळे खड्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यातच झुंजवाड गावच्या पुलाजवळील रस्त्याच्या दोन्ही बाजूची शेतवडी रस्त्यापेक्षा उंचीवर आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यवस्थितरित्या गटारी नाहीत. काही ठिकाणी असलेल्या गटारीत माती व कचरा साचल्याने गटारीचे अस्तित्वाच नष्ट झाले आहे. प्रसंगी गटारीचे व शेतवडीतील पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे. खड्यांतून पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना ख•dयांचा अंदाज येत नसल्याने लहान मोठे अपघात होत आहेत. तर एखादा पादचारी किंवा दुचाकीधारक रस्त्यावरून जात असताना मोठ्या वाहनामुळे खड्यातील पावसाचे पाणी दुचाकी धारकांच्या अंगावर गेल्याने वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत.