झारखंड महिला हॉकी विजेता
वृत्तसंस्था/पंचकुला (हरियाणा)
हॉकी इंडियाच्या 15 व्या वरिष्ठ महिलांच्या राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेचे अजिंक्यपद झारखंड महिला हॉकी संघाने पटकाविले. या स्पर्धेतील झालेल्या अटितटीच्या अंतिम सामन्यात झारखंडने विद्यमान विजेत्या हरियाणाचा पेनल्टी शुटआऊटमध्ये 4-3 अशा गोलफरकाने पराभव केला.हा अंतिम सामना सुरू झाल्यानंतर मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांनी दर्जेदार खेळाचे दर्शन घडविले. निर्धारीत वेळेत दोन्ही संघांनी उत्तराधार्थ प्रत्येकी 1 गोल केला. विद्यमान विजेत्या हरियाणा महिला संघातील कर्णधार राणीने 42 व्या मिनिटाला गोल नोंदविला. पण हरियाणाला ही आघाडी अधिकवेळ राखता आली नाही. 44 व्या मिनिटाला प्रमोदिनी लाक्राने झारखंडला बरोबरी साधून दिली.
निर्धारीत वेळेमध्ये दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत राहिले. झारखंडने पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीतच पेनल्टी कॉर्नर मिळविला. पण तो वाया गेला. सामन्याच्या दुसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघांना प्रत्येकी 1 पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण त्याचा लाभ त्यांना घेता आला नाही. 42 व्या मिनिटाला हरियाणाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नर्सचा कर्णधार राणीने फायदा घेत संघाचे खाते उघडले. लाक्राने मैदानी गोल करुन झारखंडला बरोबरी साधून दिली. 51 व्या मिनिटाला दोन्ही संघांना निर्णायक गोल करण्याची संधी लाभली होती. पण भक्कम गोलरक्षणामुळे हा सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. त्यानंतर पंचांनी पेनल्टी शुटआऊटचा अवलंब केला. पेनल्टी शुटआऊटमध्ये झारखंडतर्फे रजनी करकेटा, निवाली कुजूर, बिनीमा धन आणि कर्णधार अल्बेला राणी टोप्पो यांनी गोल केले.