For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झारखंड सचिवालयाची ईडीकडून झाडाझडती

06:25 AM May 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
झारखंड सचिवालयाची ईडीकडून झाडाझडती
Advertisement

कोट्यावधींच्या नोटांप्रकरणी छापासत्र सुरूच

Advertisement

वृत्तसंस्था/ रांची

झारखंडमध्ये तिसऱ्या दिवशीही ईडीचे छापे सुरूच आहेत. बुधवारी झारखंड मंत्रालयातील ग्रामीण विकास विभागाच्या कार्यालयावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी बराचवेळ तपासणी केली. मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांचे कार्यालय असलेल्या ठिकाणी ईडीकडून सर्व कागदपत्रे तपासण्यात आली. ईडीच्या छाप्यावेळी संजीव लाल देखील हजर होते.

Advertisement

झारखंडमधील मंत्री आलमगीर आलम यांचे सचिव संजीव लाल आणि त्यांचा सहाय्यक जहांगीर आलम यांना मंगळवारी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही सहा दिवसांच्या रिमांडवर पाठवले आहे. याचदरम्यान संजीव लाल यांना सचिवालयातील त्यांच्या कक्षामध्ये घेऊन जात तेथील कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. बुधवारी दिवसभर ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सचिवालयात कागदपत्रांची झाडाझडती सुरू होती.

ईडीचे अधिकारी ग्रामविकास विभागाच्या सर्व निविदांशी संबंधित कागदपत्रे तपासत आहेत. संजीव लाल यांच्या माध्यमातून झालेली सर्व कामे आणि निकाली काढण्यात आलेल्या फाईल्सची चौकशी करण्यात येत आहे. या तपासावेळी ग्रामविकास विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना कक्षाबाहेर पडण्याची परवानगी नव्हती. या तपासादरम्यान ग्रामीण विकास विभागाच्या कार्यालयाबाहेर सीआरपीएफचे जवान उपस्थित होते. या कालावधीत बाहेरील व्यक्तींच्या प्रवेशावरही बंदी घालण्यात आली होती. सध्या ग्रामविकास विभाग पूर्णपणे ईडीच्या ताब्यात असून रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरूच होती. ईडीच्या हाती लागलेल्या कागदपत्रांमध्ये जुन्या तसेच नवीन अभियंत्यांची गैरकृत्ये उघड होत आहेत. या प्रकरणात काही अधिकाऱ्यांची भूमिकाही संशयास्पद आहे.

Advertisement
Tags :

.