खाकी वर्दीला कलंक! पती विरुद्ध तक्रारदार द्यायला गेलेल्या महिलेवर पोलीस ठाण्यातच बलात्कार, सहाजण निलंबित
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, 29 ऑक्टोबर रोजी रात्री ती पतीसोबत भाजी खरेदीसाठी बाजारात गेली होती. घरी परतताना पतीसोबत तिचा वाद झाला. पतीने मद्यपान केल्यानंतर मारहाण केल्याने घाबरलेली महिला रात्री सुमारे 9.30 वाजता अॅसिड प्लांट गेट परिसरात थांबली. त्यानंतर तिने तेथून निघून स्थानिक महिलेची मदत घेत पोलिसांशी संपर्क साधला.
महिलेच्या मदतीसाठी गम्हरिया पोलीस ठाण्याचे पीसीआर वाहन घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर रात्री सुमारे 12 वाजता तिला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे तिला बाजूच्या खोलीत थांबण्यास सांगण्यात आले. महिलेच्या आरोपानुसार, त्या खोलीत असताना वायरलेस ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेला पोलीस शिपाई नीरज लकडा तेथे आला आणि त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
मदतीसाठी आरडाओरड; सहकारी पोलिसांवरही आरोप
महिलेने आरडाओरड केल्यानंतर चार पोलीस कर्मचारी खोलीत आले; मात्र त्यांनी आपल्याला मदत केली नाही, असा आरोप तिने तक्रारीत केला आहे. स्वतःचा बचाव करण्यासाठी खोलीत फळे कापण्यासाठी ठेवलेल्या चाकूने आरोपीवर वार केल्याचेही महिलेने सांगितले. या झटापटीत आरोपीच्या बोटाला जखम झाली. त्याच्या रक्ताचे डाग महिलेच्या कपड्यांवर असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सकाळी पैसे देऊन स्टेशनवर पाठवल्याचा आरोप
महिलेच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या दिवशी सकाळी आणखी एक पोलीस कर्मचारी तेथे आला. त्याने आरोपी पोलीस शिपायाकडून 700 रुपये घेऊन महिलेला दिले आणि तिला ऑटोने रेल्वे स्थानकाकडे पाठवले. माहेरी निघून जाण्याची सूचनाही देण्यात आल्याचा आरोप आहे. गम्हरिया स्थानकाजवळ तिची पतीशी भेट झाल्यानंतर ती घरी परतली. घरी पोहोचल्यानंतर तिने कुटुंबीयांना संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर तिने गम्हरिया पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
एसआयटीकडून तपास; घटनास्थळाची पाहणी
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरायकेला-खरसावां जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज स्वर्गियारी यांनी सरायकेला उपविभागीय पोलीस अधिकारी अनुभव भारद्वाज यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. एसडीपीओंनी पोलीस पथकासह गम्हरिया पोलीस ठाण्याला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. ठाणेप्रमुख आणि संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे. पुराव्यांमध्ये फेरफार होऊ नये म्हणून संबंधित खोली सील करण्यात आल्याची माहिती आहे.
ठाणेप्रमुखासह 6 जणांवर निलंबनाची कारवाई
या प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून ठाणेप्रमुख संजय प्रसाद, उपनिरीक्षक मनोज साहू, अनिरुद्ध सिंह, हवालदार मुनेश्वर कुमार आणि पोलीस शिपाई संतोष राय यांना निलंबित करण्यात आले आहे. आरोपी पोलीस शिपाई नीरज लकडा यालाही निलंबित करून अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तिला रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.
या प्रकरणाचा पुढील तपास एसआयटीकडून सुरू असून, महिलेने केलेल्या आरोपांची पडताळणी आणि संबंधित पुराव्यांची तपासणी केली जात आहे. तपासातून समोर येणाऱ्या निष्कर्षांनंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
