शिबू सोरेन यांना भारतरत्न देण्याची झारखंड विधानसभेची मागणी
रांची : दिवंगत नेते शिबू सोरेन यांना भारतरत्न देण्याची मागणी करणारा प्रस्ताव झारखंड विधानसभेत सर्वसंमतीने संमत झाला आहे. राज्याचे समाजकल्याणमंत्री दीपक बिरुआ यांनी सभागृहात हा प्रस्ताव मांडला होता. शिबू सोरेन यांनी झारखंड आंदोलनासाठी स्वत:चे जीवन अर्पण केले होते. त्यांच्या संघर्षामुळे नवे राज्य आणि नवी ओळख मिळाली. शिबू सोरेन यांना भारतरत्न देण्याची केंद्र सरकारकडे मागणी करणारा प्रस्ताव मांडत असल्याचे बिरुआ यांनी म्हटले. यावर विरोधी पक्षनेते बाबुलाल मरांडी यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवत यात मरांग गोमये जयपाल सिंह मुंडा आणि विनोद बिहारी महतो यांनाही भारतरत्न देण्याची मागणी जोडण्याची सूचना केली. झारखंड राज्याच्या निर्मितीसाठी आंदोलन करणारे शिबू सोरेन यांचे दीर्घ आजारानंतर 4 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर पासून शिबू सोरेन यांना भारतरत्न देण्याची मागणी जोर पकडू लागली आहे.