For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यहुदी नागरिक दहशतवादाचे लक्ष्य

06:34 AM Dec 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
यहुदी नागरिक दहशतवादाचे लक्ष्य
Advertisement

ऑस्ट्रेलिया देशातील सिडनी येथील बॉण्डाय बीचवर नुकताच तेथील हनुक्का सणाच्या सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान यहुदी ऑस्ट्रेलियन नागरिकांना लक्ष्य करून जो भीषण दहशतवादी हल्ला करण्यात आला त्याचे साद-पडसाद जगभर उमटणे साहजिक होते.

Advertisement

या हल्ल्यात किमान पंधराजणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर झाले आहेत. हळूहळू बळींची संख्या वाढत असल्याचेही चिन्ह दिसत होते. या हल्ल्याबाबत कसून चौकशी केली जात असून जे दोघेजण संशयित म्हणून मानले गेले आहेत त्यांच्याकडून हल्ल्याचा नेमका हेतू काय होता, हल्ल्याचे नियोजन केव्हा व कसे केले गेले, एखादी मोठी दहशतवादी संघटना यामागे आहे काय आदी प्रश्नांची पडताळणी केली जात आहे. काही असले तरी एक गोष्ट सूर्यप्रकाशाएवढी स्पष्ट आहे की, हा हल्ला ऑस्ट्रेलियातील यहुदी समुदायाविरोधातील वाढत जाणाऱ्या द्वेष आणि मत्सर भावनेतून झालेला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ ऑस्ट्रेलियाच नव्हे तर जगभर जेथे जेथे यहुदी समाज आणि यहुदी संस्था पोहचल्या आहेत, त्या त्या भागात या समाजावरील व या समाजाच्या संस्थांवरील हल्ल्यांच्या वाढीत भर पडत चालली आहे.

येथे दीड-दोन वर्षापूर्वीच्या एका हल्ल्याकडे लक्ष वेधावेसे वाटते. ऑक्टोबर 2023 ला झालेल्या इस्त्राइल-हमास संघर्षानंतर यहुदी समुदायाविरोधातील छळवाद, पिळवणूक आणि दहशत या तिन्हींमध्ये वाढ झाल्याने कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याची नोंद झालेली आहे. उपलब्ध माहितीनुसार 2023 पासून आजतागायत जवळपास पन्नास मोठ्या घटना घडलेल्या आहेत. एवढे हल्ले होऊनही या हल्ल्यांकडे गंभीरपणे पाहिले नसावे, म्हणूनच हा ऑस्ट्रेलियातील दहशतवादी हल्ला घडला. विशेष म्हणजे पोर्ट आर्थर हत्याकांडानंतर ऑस्ट्रेलिया देशाच्या इतिहासातील हा सर्वात भीषण हल्ला मानला जात आहे. त्यामुळे या देशातील यहुदी जसे तणावाखाली आहेत, तसेच हा देशही तणावाखाली वावरत असल्याचे दिसते.

Advertisement

योगायोगाने सिडनीतील समुद्रकिनारा आणि गोव्यातील समुद्रकिनारा यात त्याच दरम्यान दहशतवाद आणि अग्नितांडव याचा प्रलय झालेला दिसतो. 14 डिसेंबर रोजी सिडनीमधील ज्या शहरात हा दहशतवादी हल्ला झाला त्या शहरातील बॉण्डाय हा जगातील सर्वात गर्दीमय समुद्रकिनारा म्हणून ओळखला जातो. 6 डिसेंबर रोजी मध्यरात्री जागतिक कीर्तीच्या गोव्यातील कळंगुट समुद्रकिनाऱ्याजवळच्या हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ नाईट क्लबमधील झालेल्या अग्नितांडवातील दुर्घटनेतही 25 माणसांचे बळी गेले होते व अनेकजण गंभीररित्या जखमी झाले होते.

सिडनीमधील दहशतवादी हल्ल्यात गुरफटलेले पळून गेले होते तर हडफडेतील अग्नितांडवानंतर थायलंडमध्ये पळून गेलेल्या लुथरा बंधूंना गोव्यात आणण्यात व देशात इतरत्र पळून गेलेल्या इतर संबंधितांना गोव्यात आणण्यात पोलिस यशस्वी ठरले होते.

जागतिक कीर्तीच्या अशा समुद्रकिनाऱ्यावरील आकांडतांडवामुळे त्याचा दुष्परिणाम अर्थातच जागतिक पर्यटनावरही होणार आहे, याचाही यावेळी गंभीरपणे विचार होणे महत्त्वाचे वाटते कारण जसजसे जग बदलत आहे तसतसे नवे धोके निर्माण होऊ लागले आहेत, असे एकूण चित्र दिसते. असो.

ज्या सिडनीच्या समुद्रकिनाऱ्यावर या घटनेचे पडसाद उमटले, त्या समुद्रकिनाऱ्यावर यहुदी-म्हणजे ज्या समुदायाचे अंदाजे चारशे ते पाचशे लोक त्यांच्या प्रिय ‘हनुका’ या सणाच्या निमित्ताने एकत्र आले होते. हा सण म्हणजे विशेषत: दिव्यांचा उत्सव म्हणून ओळखला जातो. आपल्या पारंपरिक व प्रिय असलेल्या उत्सवाची सुरूवात 14 डिसेंबर रोजी होणार होती. अशा त्यांच्या आनंदमयी सणात आनंदी वातावरणात असलेल्या ज्यू लोकांवर पूर्ववैमनस्यातून अचानकपणे तब्बल 10 मिनिटांपर्यंत तुफानी गोळीबार करून लोकांचे बळी घेणे, त्यांना गंभीरपणे जखमी करणे हे कृत्य खरोखरच माणुसकीला काळिमा फासणारे आहे. पण हे कसाब प्रवृत्तीच्या कसायांना कसे बरे कळणार? उघडकीस आलेल्या माहितीनुसार साजीद आणि नाविद विक्रम अशी या दोन दहशतवाद्यांची नावे असून जे पिता-पुत्र आहेत. या हल्ल्याचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करणे हेच होते. गेल्या काही वर्षांमध्ये हा प्रकार यत्र-तत्र सर्वत्र वाढत असल्याचे दिसून येत आहे.

आपल्या देशात पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी अशा प्रकारचा हल्ला घडवून आणला होता व त्याला ‘सिंदूर ऑपरेशन’ मधून योग्य तो धडा योग्यवेळी, योग्यप्रकारे मिळाल्यामुळे त्यांचे कंबरडे मोडून काढण्यात आपण यशस्वी ठरलो हा इतिहास तर ताजाच आहे.

वर नमूद केल्याप्रमाणे या सर्व प्रकरणाची सुरूवात 7 ऑक्टोबर 2024 रोजी झाली. या दिवशी ‘हमास’ या संघटनेने इस्त्रायलवर अशाच पद्धतीने ज्यू समुदायाच्या व्यक्तींवर भीषण हल्ला करून तीनशेपेक्षा जास्त निष्पाप लोकांचा बळी घेतला होता, शेकडो नागरिकांना जखमी केले होते. त्याला मग अत्याधुनिक शस्त्रसामर्थ्याच्या बळावर इस्त्रायलने जशास तसे-म्हणजे आपण ज्याप्रकारे ‘सिंदूर ऑपरेशन’ केले त्याचप्रमाणे आपले सामर्थ्य दाखवीत इस्त्रायलने हमासचे कंबरडे मोडले होते.

तशी यहुदी विरोधातील गोष्ट ही काही आता नवी म्हणता येणार नाही. तो आता अपरिहार्यपणे इतिहासाचा भार होऊ पाहत आहे. याचे कारण म्हणजे हिंसक, दहशतवादी आणि फॅसिस्ट लोकांनी वेळोवेळी याला खतपाणी घातले आहे. अधिक खोलात जाऊन विचार केल्यावर आपल्या लक्षात येते ते हे की, केवळ जगभरातील यहुदी समाजालाच नव्हे तर संपूर्ण कमकुवत समाजरचनेलाच हादरवून टाकणारे, त्यांचे अस्तित्व संपुष्टात आणू पाहणारे हे मारक आणि घातक विचार आहेत.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जगभरातील शांततावादी व अहिंसक देशांनी-ज्यात आपल्या देशानेही मोठा हातभार लावलेला आहे. त्याला विरोध करून त्या इस्लामिक स्टेट आणि त्याची रानटी आणि जिहादी व अमानवी विचारसरणी हिंसाचाराला, अत्याचाराला प्रेरणाच देत आहे व याला विरोध करणाऱ्यांचे खच्चीकरण करू पाहत आहे. आज यहुदी नागरिक दहशतवादाचे लक्ष्य ठरत आहेत. जागतिक शांतीदूतांनी जे रोखण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करणे फार गरजेचे आहे. नपेक्षा लोकशाहीचे काही खरे नाही. आज यहुदी दहशतवादाचे लक्ष्य ठरत आहेत, उद्या हा हल्ला इतरांवरही होऊ शकतो, याची जाणीव ठेवून कार्यरत असले पाहिजे.

- शंभू भाऊ बांदेकर

Advertisement
Tags :

.