रेल्वेत सापडलेले 10 लाख रुपये किमतीचे दागिने प्रवाशाला सुपूर्द
16 आरपीएफ जवानांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : रेल्वेतील आरपीएफ जवानांच्या प्रामाणिकपणामुळे प्रवाशाचे 10 लाख 56 हजार किमतीचे सोन्याचे दागिने पुन्हा मिळाले आहेत. रेल्वेत बेवारस स्थितीत असलेली ट्रॉली बॅग ताब्यात घेऊन ती रेल्वे पोलीस स्थानकात जमा करण्यात आली. संबंधित प्रवाशाची ओळख पटवून ती त्या प्रवाशापर्यंत पोहोचविण्यात आल्याने आरपीएफ जवानांचे कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ठाणे येथील सुधाकर शुक्ला हे पाँडेचेरी एक्स्प्रेसने कल्याण ते घटप्रभा या दरम्यान प्रवास करीत होते. घटप्रभा रेल्वे स्थानकावर उतरताना त्यांच्याकडून नकळतपणे एक ट्रॉली बॅग रेल्वेतच राहिली. सदर रेल्वे बेळगाव रेल्वे स्थानकात आल्यानंतर एक बेवारस स्थितीत ट्रॉली बॅग असल्यामुळे आरपीएफ जवानांनी ही बॅग ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात ठेवली.
तोवर त्या प्रवाशाने घटप्रभा रेल्वेस्थानकातून आपली बॅग रेल्वेतच राहिल्याची तक्रार दाखल केली होती. संबंधित प्रवासी बेळगावमध्ये आल्यानंतर सामानाची ओळख पटवून ती बॅग प्रवाशाच्या ताब्यात देण्यात आली.
या बॅगेमध्ये 40 ग्रॅम वजनाचे 5 लाख 60 हजार किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, 20 ग्रॅम वजनाचा 2 लाख 80 हजार रुपयांचा सोन्याचा हार, 1 लाख 40 हजार किमतीचे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याची कर्णफुले, 70 हजार किमतीचे 5 ग्रॅम सोन्याची नथ, 2हजार रुपयाचे फॅन्सी दागिने तर 4 हजार किमतीचे कपडे असे एकूण 10 लाख 56 हजार रुपये किमतीचे साहित्य त्या प्रवाशाकडे सुपूर्द करण्यात आले. बेळगाव रेल्वे स्थानकात कार्यरत असलेल्या ताराचंद जाट यांनी हे दागिने त्या प्रवाशाना परत केल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.