बँक कर्मचाऱ्याच्या बंगल्यातून 10.50 लाखाचे दागिने लंपास
आंदोलननगरातील घटना : निपाणी पोलिसांसमोर आव्हान : दोघे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
निपाणी : आंदोलननगर येथील बँक कर्मचारी विनीत सुनील पाटील यांचा बंद बंगला फोडून दोन तिजोरी व एका शोकेसमधील 9 तोळे सोन्याचे दागिने तसेच 1.5 किलो चांदीचे दागिने असा एकूण 10 लाख 50 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना गुरुवारी सकाळी 9 च्या सुमारास उघडकीस आली. याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी, विनीत पाटील व त्यांचे कुटुंबीय नंदगड येथे बुधवारी सकाळी 11 वाजता गेले होते. दरम्यान, चोरट्याने हीच संधी साधून बुधवारी रात्री 12.30 च्या सुमारास बंद बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
दोन तिजोरी व एका शोकेसमधील सर्व साहित्य विस्कटले. त्यातील 9 तोळे सोने व 1.5 किलो चांदाचे दागिने असा सुमारे 10 लाख 50 हजारांचा ऐवज लंपास केला. त्यामध्ये सोन्याचा राणीहार दोन तोळे, सोन्याची चेन अर्धा तोळा, सोन्याच्या अंगठ्या अर्धा तोळा, सोन्याचे गंठण साडेतीन तोळा असे एकूण 9 तोळ्याचे दागिने तसेच चांदीच्या आरत्या, कडदोरा, पैंजण, ब्रेसलेट, छल्ला अशी जवळपास दीड लाखाची चांदी चोरट्यांनी लांबविली. सदरची घटना गुरुवारी सकाळी 9 च्या सुमारास शेजारील नागरिकांच्या लक्षात आली. त्यानुसार त्यांनी या घटनेची माहिती निपाणी शहर पोलिसांना दिली.
त्यानुसार निपाणी शहर पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक एस. एस. नरसप्पानावर, बसवेश्वर चौक पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक रमेश पवार, हवालदार उमेश माळगे, राजू दिवटे, यासीन कलावंत यांनी प्रथमत: घटनास्थळी येऊन पाहणी केली. दरम्यान, सदर घटना बुधवारी मध्यरात्री 12.30 च्या सुमारास नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामध्ये दोघे चोरटे दुचाकीवरून आल्याचे दिसत आहे. सदर घटनेसंदर्भात विनीत यांची आई सुनिता पाटील यांनी निपाणी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीस तपास करत आहेत.
घटनास्थळी ठस्से तज्ञ, श्वानपथकाला पाचारण
बेळगावहून ठस्से तज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. दुपारी 2.30 च्या सुमारास श्वान पथकातील नीला नावाचे कुत्रे विनीत पाटील यांच्या बंगल्यापासून मार्ग शोधत पलिकडच्या गल्लीतील कोपऱ्याजवळ जाऊन घुटमळले. पाटील कुटुंबीय विनित यांच्या पत्नीचे बेळगाव येथील विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी गेले होते. गुरुवारी दुपारी 2 च्या सुमारास पाटील कुटुंबीय परत आल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आला. सदर घटनेमुळे पाटील कुटुंबीय भयभीत झाले आहे.