आरग येथील पद्मावती मंदिरातील दागिन्यांची चोरी
मिरज/बेडग :
तालुक्यातील आरग येथे माता पद्मावती मंदिर फोडून देवीच्या मूर्तीवरील सुमारे साडेआठ तोळे सोन्याचे दागिने व दीड किलो चांदीचे दागिने असा 3 लाख, 42 हजार ऊपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. गुरूवारी मध्यरात्री दीड ते तीन वाजण्याच्या सुमारास चोरी झाली. मंदिरातून बाहेर जाणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला. नुकत्याच झालेल्या देवीच्या धार्मिक विधान व रथयात्रा महोत्सवावेळी भाविकांनी देवीला अर्पण केलेल्या दागिन्यांवर चोरट्याने पाळत ठेवून चोरी केल्याचा संशय आहे. याबाबत मंदिराचे ट्रस्टी शितल आण्णासा उपाध्ये (वय 60) यांनी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे. मंदिर फोडल्याच्या घटनेने आरगसह परिसरात खळबळ उडाली आहे.
आरगेत महावीर चौक येथे उपाध्ये कुटुंबियांनी 70 वर्षांपूर्वी स्थापन केलेले स्वयंभू पार्श्व माता पद्मावती मंदिर आहे. बुधवारी रात्रीनंतर पुजारी उपाध्ये यांनी नियमितपणे मंदिर बंद केले होते. गुरूवारी पहाटे मंदिर उघडल्यानंतर देवीच्या गाभाऱ्यातील मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा उचकटल्याचे दिसला. पुजाऱ्यांनी आत जावून पाहणी केली असता देवीच्या मूर्तीवरील सर्व दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी ठसे तज्ञ व श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेतली. परिसराचा पंचनामा करण्यात आला. श्वान पथक मंदिरापासून काही अंतरावर घुटमळले.
पोलिसांनी मंदिरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये मध्यरात्री तीनच्या सुमारास एक इसम संशयास्पदरित्या मंदिरातून बाहेर आल्याचे दिसते. त्यानंतर दुचाकीवऊन तो निघून गेला. याशिवाय मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातील सीसीटीव्हीचा डीव्हीआरही पोलिसांना मिळाला. यामध्ये देवीचे दागिने चोरी करणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाल्याचे सांगण्यात आले. तपासकामी पोलिसांनी सदर डीव्हीआर ताब्यात घेतला आहे.
या मंदिराला पाठीमागून जिना व वरील मजल्यावर जाण्यासाठी दरवाजा आहे. रात्री दीडच्या सुमारास चोरटा जिन्यावऊन आधी वरच्या मजल्यावर गेला. त्यानंतर गॅलरीतून मुख्य मंदिरात उडी मारली. त्यानंतर मुख्य गाभाऱ्याच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. व देवीच्या अंगावरील सर्व दागिने लुटून नेले, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
मंदिरात चोरी झाल्याची बातमी पसरल्यानंतर भाविकांसह ग्रामस्थांनी मंदिराभोवती गर्दी केली. नुकत्याच झालेल्या उत्सवामुळे देवीला अनेक प्रकारचे दागिने दान केले होते. यातील 18 तोळे दागिने चोरीस गेल्याची चर्चा पसरली. मात्र, मंदिर ट्रस्टींनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार आठ तोळे सोन्याचे दागिने व दीड किलो चांदीचे दागिने असा तीन लाख, 42 हजारांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे नमुद केले आहे.
- असली नेले चोऊन, नकली दिले टाकून
मंदिर ट्रस्टी शितल उपाध्ये यांनी सांगितले की, देवीच्या मूर्तीवर असली दागिन्यांसह काही आकर्षक वाटणारे कृत्रिम पध्दतीचे नकली दागिनेही होते. मंदिर बंद करताना देवीच्या अंगावर दागिने तसेच ठेवले जातात. मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्याला असली सोन्याची पारख असण्याची शक्यता आहे. देवीच्या अंगावरील सर्व असली दागिने चोऊन नेत असताना त्याने नकली दागिने मात्र मंदिरातच टाकले आहेत. असली-नकली ओळखून चोरी करणारा चोरटा हा सराईत असल्याची शक्यता आहे.
- दान केलेल्या दागिन्यावर चोरटा भाळला
उपाध्ये कुटुंबियांनी 70 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या या मंदिराचा 23 वर्षांपूर्वी जिर्णोद्वार झाला. तेव्हापासून प्रत्येकवर्षी माता पद्मावती धार्मिक विधान महोत्सव आणि रथोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. 27 ते 29 डिसेंबर रोजी हा उत्सव झाला. उत्सव काळात देवीच्या कुंकूमार्चन पुजेवेळी सुहासिनी महिलांनी आपल्या अंगावरील दागिने केवळ पुजेसाठी देवीच्या अंगावर चढविण्याची परंपरा आहे. उत्सवावेळी महिला भाविकांनी अनेक प्रकारचे दागिने तात्पूरत्या स्वऊप दान केले. पुजा झाल्यानंतर सर्व दागिने संबंधीत महिला भाविकांना परत देण्यात आले. मात्र, चोरट्याने उत्सव काळातील याच दागिन्यांवर पाळत ठेवली. दान केलेल्या दागिन्यांवर भाळूनच त्याने मंदिर फोडल्याचा संशय व्यक्त होत आहे.
- लवकरच चोरटा गजाआड करु
मंदिरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासकामी ताब्यात घेतले आहेत. सीसीटीव्हीच्या चित्रणावऊन चोरट्याचा माग काढण्यासाठी प्रयत्न सुऊ आहे. तपास कामी ग्रामीण पोलिस व स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पथक रवाना केले आहेत. लवरकरच चोरट्याला गजाआड केले जाईल.
अजित शिंदे (मिरज ग्रामीण पोलिस निरीक्षक)