For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगावातही लॉकरमधील दागिने चोरले

12:43 PM Jul 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
बेळगावातही लॉकरमधील दागिने चोरले
Advertisement

कंत्राटी कर्मचाऱ्याचा प्रताप : 14 लाखांचे दागिने हस्तगत : टिळकवाडी पोलिसांची कारवाई

Advertisement

बेळगाव : मनगुळी (जि. विजापूर) येथील कॅनरा बँकेच्या लॉकरमधून 58 किलो सोने बँकेच्या माजी व्यवस्थापकानेच आपल्या साथीदारांच्या साहाय्याने चोरल्याची घटना ताजी असतानाच बेळगावातही बँक लॉकरमधील सोन्याचे दागिने चोरल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी टिळकवाडी पोलिसांनी त्याच बँकेत काम करणाऱ्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याला अटक केली आहे. भाग्यनगर येथील इंडियन बँकेच्या शाखेत चोरीची ही घटना घडली होती. चंद्रकांत बालाजी जोरली (वय 32) राहणार काकती असे पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचे नाव आहे.

पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच., टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी, उपनिरीक्षक विश्वनाथ घंटामठ, उपनिरीक्षक प्रभाकर डोळ्ळी, महेश पाटील, एस. एम. करलिंगन्नावर, लाडजीसाब मुलतानी, नागेंद्र तळवार, अरुण पाटील, नवीनकुमार जी. आदींनी ही कारवाई केली.अटक करण्यात आलेल्या चंद्रकांतकडून सोन्याच्या अंगठ्या, चेन, लॉकेट, नेकलेस, मंगळसूत्र असे सुमारे 14 लाख रुपये किमतीचे 149.09 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. भाग्यनगर दुसऱ्या क्रॉसवरील इंडियन बँक शाखेच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आलेले हे दागिने चंद्रकांतने पळविल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

Advertisement

26 जून रोजी यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला होता. बँक व्यवस्थापक किरणकुमार पी. यांनी फिर्याद दिली होती. 3 ऑगस्ट 2024 च्या सायंकाळी 5 ते 4 जून 2025 च्या सकाळी 10.30 यावेळेत चोरीची ही घटना घडली आहे. बँक लॉकरमध्ये ठेवण्यात आलेले 165.07 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरण्यात आले होते. चंद्रकांतवर संशय बळावल्याने त्याला अटक करून चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याजवळून सुमारे 14 लाख रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहेत.

Advertisement
Tags :

.