शॉर्टसर्किटचा कहर! जेऊरमध्ये नऊ एकर ऊस जळून खाक; पाच शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका
जेऊर प्रतिनिधी | शिवराज बोरीकरजगी : महावितरणच्या विद्युत तारांमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने जेऊर गावातील शिरवळ परिसरात उसाच्या शेताला आग लागली. या आगीत सुमारे नऊ एकर ऊस जळून खाक झाला असून, पाच शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या आगीत महादेव देवप्पा उमराणी, सोमनाथ गुरशांतप्पा उमराणी, शंकरलिंग शरणप्पा उमराणी, राजशेखर काशिराया उमराणी आणि लक्ष्मण इरणा बगले या पाच शेतकऱ्यांच्या उसाचे नुकसान झाले. उसाच्या पिकासोबतच ठिबक सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या पाइपलाइन, ड्रिप पाइप, मोटारीची केबल आणि विद्युत वायरही जळून नुकसान झाले आहे.
26 ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच अक्कलकोट येथील अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आगीत मोठ्या प्रमाणात ऊस जळून खाक झाला. शेतकऱ्यांनी वर्षभर कष्ट करून जोपासलेले पीक आगीत नष्ट झाल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. पिकासोबत सिंचनासाठी उभारलेल्या साहित्याचेही नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे.
नुकसानभरपाई देण्याची मागणी
महावितरण विभागाने या घटनेची सखोल चौकशी करून नुकसानीचा पंचनामा करावा आणि बाधित शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
