जर्सीच्या गदारोळातून हॉकी इंडियात खळबळ
अध्यक्ष तिर्की म्हणतात सल्लामसलत झाली नाही; सरचिटणीस म्हणतात सर्वांना माहिती होती
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाच्या नव्या भगव्या जर्सीवरून निर्माण झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर हॉकी इंडियामध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी हा निर्णय आपल्या माहितीशिवाय घेण्यात आल्याचे म्हटले आहे, तर सचिव भोलानाथ सिंह यांनी या बदलाची सर्व पदाधिकाऱ्यांना माहिती होती, असे स्पष्ट केले आहे.
पारंपरिकपणे निळ्या रंगाचा पोषाख परिधान करणारा भारतीय हॉकी संघ 15 ऑगस्टपासून नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत भगव्या रंगाचा पोषाख परिधान करणार आहे. 27 जुलै रोजी जाहीर झालेल्या गणवेशाच्या रंगातील या बदलावर वासुदेवन भास्करन, विरेन रास्किन्हा, अजित पाल सिंग आणि परगत सिंग यांच्यासह इतर माजी खेळाडूंनी तीव्र टीका केली आहे. या सर्वांनी अशा निर्णयामागील तर्कावर प्रश्न उपस्थित केले असून यामुळे अनेक दशकांपासून जपलेल्या संघाच्या ओळखीवर परिणाम होईल, असे म्हटले आहे.
कालपर्यंत तिर्की यांच्यासह हॉकी इंडियाने असा दावा केला होता की, ज्या निळ्या टर्फवर सामने खेळले जातात त्याच्याशी असलेले साम्य टाळण्यासाठी हा पूर्णपणे तांत्रिक निर्णय घेण्यात आलेला आहे. संघटनेने म्हटले होते की, रंगातील साम्यामुळे खेळाडूंच्या दृष्टीने मैदानातील स्पष्टता आणि दृश्यमानतेवर परिणाम होत होता. तथापि, हॉकी इंडियाच्या अधिकाऱ्यांना पाठवलेल्या एका अंतर्गत मेलमध्ये तिर्की यांनी म्हटले आहे की, हा निर्णय कार्यकारी मंडळासमोर चर्चेसाठी न ठेवता आणि माझ्या पूर्वज्ञानाशिवाय घेण्यात आला आहे. मी संबंधित हॉकी इंडियाच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की, त्यांनी मला लवकरात लवकर लेखी स्पष्टीकरण द्यावे, ज्यामध्ये या निर्णयाचा आधार, अवलंबलेली प्रक्रिया आणि ज्या परिस्थितीत हा बदल मंजूर करून लागू करण्यात आला त्याचा तपशील असावा, असे त्यांनी मेलमध्ये म्हटले आहे.
यासंदर्भातील स्पष्टीकरण ओडिशा सरकारने मागितले आहे, जे संघाचे मुख्य प्रायोजक आहेत. ओडिशा सरकारनेही मला या प्रकरणी स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. त्यामुळे मी संबंधित हॉकी इंडियाच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की, त्यांनी मला लवकरात लवकर लेखी स्पष्टीकरण द्यावे, ज्यामुळे मला योग्य आणि अचूक प्रतिसाद देणे शक्य होईल, असे तिर्की म्हणाले.
इतका मोठा मुद्दा बनेल असे वाटले नव्हते
मात्र हॉकी इंडियाचे सचिव भोलानाथ सिंह यांनी सांगितले की, खेळाडूंनी योग्य विचारविनिमय करून जी मागणी केली होती त्याचीच अंमलबजावणी केली आहे. ‘रंग बदलण्याचा निर्णय आमच्या अंतर्गत गटात प्रसारित करण्यात आला होता, त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांना याची माहिती असायला हवी. हा इतका मोठा मुद्दा बनेल असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. रंग बदलण्यासाठी आमच्यावर कोणीही दबाव आणलेला नाही. त्यावर विनाकारण राजकारण केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हॉकी इंडिया या निर्णयावर पुनर्विचार करेल का, असे विचारले असता, सिंह म्हणाले, मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही, अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी आहेत. आम्ही एकत्र बसून चर्चा करणे आवश्यक आहे. सरतेशेवटी ही खेळाडू आणि प्रशिक्षकांची मागणी होती आणि आम्ही ती मान्य केली. खेळाडू व प्रशिक्षकांशीही बोलणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
-नव्या भगव्या जर्सीमुळे वाद चिघळला
-जर्सीच्या रंगबदलासाठी कोणीही दबाव आणलेला नसल्याचे स्पष्टीकरण
-खेळाडू व प्रशिक्षकांच्या मागणीनुसार जर्सी बदलण्याचा निर्णय
-निर्णय बदलण्यासाठी चर्चा होण्याच्या गरजेवर भर