जेफ अॅलार्डिसकडून ‘आयसीसी’ सीईओपदाला सोडचिठ्ठी
वृत्तसंस्था/ दुबई
पुढील महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी या एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेच्या काही आठवडे अगोदर ऑस्ट्रेलियन जेफ अॅलार्डिस यांनी आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद सोडत असल्याची घोषणा केली आहे.
57 वर्षीय अॅलार्डिस 2012 साली आयसीसीमध्ये क्रिकेटचे महाव्यवस्थापक म्हणून सामील झाले होते. ते क्रिकेट ऑस्ट्रेलियातून दाखल झाले होते, जिथे त्यांनी क्रिकेट ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून काम केले. आठ महिने कार्यकारी सीईओ म्हणून काम केल्यानंतर नोव्हेंबर, 2021 मध्ये त्यांची ‘आयसीसी’चे ‘सीईओ’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करणे हा एक विशेषाधिकार आहे आणि क्रिकेटच्या जागतिक प्रसारापासून ते आयसीसी सदस्यांचा व्यावसायिक पाया जाग्यावर घालण्यापर्यंत आम्ही जे निकाल मिळवले त्याबद्दल मला अतिशय अभिमान वाटतो, असे अॅलर्डिस यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
आयसीसीच्या अधिकृत निवेदनात अॅलार्डिस यांच्याकडून पदत्याग करण्यामागील नेमक्या कारणांचा उल्लेख करण्यात आला नाही, परंतु एका वरिष्ठ सूत्राने सांगितले की, गेल्या काही काळापासून यासंदर्भात घडामोड सुरू होती. खेळण्याच्या परिस्थितीचा विचार करता अमेरिकेतील आयसीसी टी-20 विश्वचषक हा खूप अपयशी ठरला आणि त्यावर खर्च बजेटपेक्षाही जास्त झाला. त्याचे ऑडिट अजूनही सुरू आहे, असे बोर्ड सदस्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. त्यातच चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजनासंदर्भातील प्रकार घडला. सीईओ म्हणून त्यांनी पाकिस्तानच्या इतक्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन करण्याच्या तयारीबद्दल स्पष्ट चित्र मांडणे अपेक्षित होते, असे ते पुढे म्हणाले.