जीवनधारा ब्लड बँकेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश घुंगुरकर यांचे निधन
सांगरुळ वार्ताहर
जीवनधारा ब्लड बँक कोल्हापूरचे अध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र ब्लड बँक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश आनंदा घुंगुरकर ( वय ४९ ) यांचे निधन झाले . गेली दोन महिने ते पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात फुफ्फुसातील संसर्ग झाल्याने आजाराशी झुंजत होते. पण त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली.
कोल्हापूर जिल्हा ब्लड बँक असोसिएशन तसेच रिबर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून ते काम पाहत होते. या माध्यमातून ते सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर होते. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रकाश घुंगुरकर यांनी मोठ्या कष्टाने आपले शिक्षण पूर्ण करत कोल्हापूर मधील एका रक्तपेढीत प्रशासन अधिकारी म्हणून नोकरी करत स्वतः जीवनधारा ब्लड बँकेची स्थापना केली. ब्लड बँकेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील जनतेशी नाळ घट्ट जोडली होती. सर्वसामान्य गरजू लोकांना रक्ताची गरज भासल्यास त्यांनी नेहमीच मदतीचा हात दिला आहे. प्रसंगी परिस्थितीनुसार काही लोकांना मोफत रक्तपुरवठा केला आहे . वृत्तपत्र क्षेत्रात पायलट, ग्रामीण पत्रकार, करवीर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ते एक यशस्वी उद्योजक म्हणून चांगली प्रगती केली होती.
ब्लड बँकेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत अनेकांना मदत केली आहेच .पण त्यांनी स्वतः शेकडो वेळा प्लेटलेट डोनेट करून जीवदान देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला शिक्षण घेताना आलेल्या अडचणीची जाणीव ठेवत सायकल रिसायकल उपक्रमातून दुर्गम भागातील अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी सायकल उपलब्ध करून दिली आहे.
उमेद फाउंडेशनच्या सामाजिक कार्यालय ही त्यांनी सातत्याने सहकार्य केले आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे . त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, आई भाऊ असा परिवार आहे .