निजदची राहुल गांधींविरुद्ध पोलीस महासंचालकांकडे तक्रार
प्रज्ज्वल रेवण्णांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा नोंदविण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेंगळूर
खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्याविषयी जाहीर सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्याविरोधात निजदने राज्य पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल केली आहे. राहुल गांधींविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. बेंगळूर शहर निजदचे अध्यक्ष एच. एम. रमेशगौडा, विधानपरिषद सदस्य के. ए. तिप्पेस्वामी, मंजेगौडा, विधानपरिषदेचे माजी सदस्य चौडरे•ाr तुपल्ली व इतर नेत्यांचा समावेश असणाऱ्या शिष्टमंडळाने बुधवारी राज्य पोलीस महासंचालक अलोक मोहन यांची भेट घेऊन राहुल गांधींविरुद्ध तक्रार दाखल केली. जबाबदारीच्या पदावर असलेले काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी शिमोगा आणि रायचूर येथे काँग्रेसच्या जाहीर सभेत सामूहिक अत्याचाराबाबत भाष्य केले. तशी माहिती प्रसारमाध्यमांसमोर दिली. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी आणि एसआयटीने त्यांना समन्स बजावावे, अशी मागणी निजदच्या शिष्टमंडळाने पोलीस महासंचालकांना दिलेल्या निवेदनात केली आहे. राहुल गांधी यांनी 2 मे रोजी जाहीर सभेत प्रज्ज्वल रेवण्णा यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करून एका अत्याचारी व्यक्तीसाठी पंतप्रधान मोदींनी मतयाचना केली आहे, हे जगजाहीर झाले आहे, असे विधान केले होते. पीडित महिलांना न्याय देण्याकडे दुर्लक्ष करून एक लोकप्रतिनिधी असून देखील राहुल गांधी यांनी आक्षेपार्ह वक्तव्ये करणे कायद्याचे उल्लंघन ठरते. त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा. राज्य सरकारने नेमलेल्या एसआयटीच्या पथकाने राहुल गांधी यांनाही समन्स बजावून चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.