अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेला जेसीबी माघारी
कॅन्टोन्मेंटची हॉटेलवरील कारवाई गुलदस्त्यात : कारवाईची मोहीम काहीवेळातच गुंडाळली
बेळगाव : कॅम्प येथील एका हॉटेलचे अतिक्रमण तोडण्यासाठी आलेला कॅन्टोन्मेंटचा जेसीबी पुन्हा माघारी गेला. अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी आखलेली मोहीम काही वेळातच गुंडाळावी लागल्याने या मागचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून अतिक्रमणाबाबत चर्चा होत असताना ते काढण्यासाठी मात्र कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांचे धाडस होत नसल्याचे चित्र दिसत आहे. कॅम्प येथील एका नामांकित हॉटेल चालकाने अतिक्रमण केले आहे. यासंदर्भात अनेकांनी तक्रारीही मांडल्या होत्या. मागील चार वर्षांपासून हे अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेण्यात येत होता. परंतु तो अंमलात आला नाही. अखेर शुक्रवारी दुपारी कॅन्टोन्मेंटचा जेसीबी घेऊन काही अधिकारी हॉटेलसमोर पोहोचले. अतिक्रमण आहे हे माहिती असतानाही हॉटेल चालकाने कागदपत्रांची मागणी केल्यानंतर अधिकाऱ्यांनीही अतिक्रमण हटाव मोहीम थांबविली. त्यामुळे जेसीबी पुन्हा कार्यालयात परत न्यावा लागला.
हॉटेल चालकाला दोन दिवसांची मुदत
इतर सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई करताना कोणताही विचार न करता क्षणार्धात कारवाई होते. मागील चार वर्षांपासून अतिक्रमण करण्यात आलेल्या हॉटेलवर मात्र कारवाई करण्यासाठी अधिकारीही पुढे येत नाहीत, असे दिसून येत आहे. तुर्तास ही मोहीम थांबविण्यात आली असून हॉटेल चालकाला दोन दिवसांची मुदत देण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु कॅन्टोन्मेंटचे अधिकारी हीच मेहेरबानी सर्वसामान्यांवर दाखवतील का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.