आमटीसाठी जेसीबी
डाळीची आमटी करण्यासाठी शिजविलेली डाळ कढईत किंवा भांड्यात फोडणी तयार करुन तिच्यात परतावी लागते, ही आपल्यापैकी बहुतेकांना माहीत आहे. डाळ परतण्यासाठी आपण घरी पळी किंवा मोठा चमचा यांचा उपयोग करतो. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये, जेथे हजारो लोकांसाठी भोजन बनवायचे असते, तेथे मोठ्या काहिलींमध्ये आमटी किंवा भाजी असे पदार्थ शिजवतात. अशावेळी खूपच मोठ्या आकाराचे झारे किंवा चमचे आमटी ढवळण्यासाठी उपयोगात आणतात.
तथापि, सध्या सोशल मिडियावर एक व्हिडीओ प्रसारित होत आहे. एका मोठ्या सार्वजनिक सभारंभासाठी भोजन बनविले जात असलेले या व्हिडीओत दाखविलेले आहे. भोजनात आमटीचाही समावेश आहे. ही आमटी एका प्रचंड मोठ्या काहिलीत बनविली जात आहे. ती ढवळण्यासाठी मोठे झारे किंवा चमचे नव्हे, तर चक्क जेसीबी मशिनचा उपयोग केला जात आहे. जेसीबी मशिन भूमी उकरण्यासाठी आणि उकरलेली माती अन्यत्र टाकण्यासाठी उपयोगात आणले जाते. या मशिनच्या समोर बसवलेले मोठे भांडे पुढेमागे होत असते. अशा प्रकारे हे भांडे काहिलीत घालून पुढेमागे करुन आमटी जसीबी मशिनच्या साहाय्याने ढवळली जात आहे, असे या व्हिडीओत दर्शविण्यात आले आहे. हा व्हिडीओ लक्षावधी लोकांनी पाहिला असून अनेकांनी विविध प्रकारच्या प्रहसनात्मक टिप्पण्याही केल्या आहेत.
हा व्हिडीओ पाहून लोकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. ज्याला हा ‘जुगाड’ सुचला, त्याचे कौतुक केले जात आहे. कारण जेसीबीच्या उपयोगामुळे आमटी ढवळण्यासाठी मानवी श्रमांची आवश्यकता नाही. तसेच या यंत्रशक्तीमुळे आमटी कमी वेळात आणि उत्तमरित्या ढवळून निघाली असणार, हे देखील उघड आहे. अशा प्रकारच्या ‘जुगाडां’ची आणि जुगाडकर्त्यांची आपल्या देशात कमतरता नाही. मात्र, काही जणांनी स्वच्छतेचा रास्त मुद्दा उपस्थित करुन आक्षेपही घेतला आहे.