राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत जयसिंगूपरच्या जुळ्या बहिणींची कमाल
महाराष्ट्र संघाला रौप्य पदक जिंकून देण्यात मोलाची कामगिरी
दिव्या व दिशा पाटील अशी आहेत जुळ्या बहिणींची नावे, केरळ संघाने पटकावले सुवर्ण तर गुजरात संघाने कांस्य
कोल्हापूर
नर्मदापुरम (मध्यप्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय 17 वर्षाखालील मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्र संघाने बुद्धिमत्तेची चूणूक दाखवत रौप्यपदक पटकावले. या पदकाला गवसणी घालण्यासाठी संघाने चार राज्यांच्या शालेय संघांना हरवण्याची किमया करत आठ गुण मिळवले. तसेच दोन तयारीच्या राज्य संघाविऊद्धचे सामने मोठ्या कौशल्याने बरोबरीत सोडवत 2 गुण मिळवले. त्यामुळे स्पर्धेत महाराष्ट्र संघात खात्यात 10 गुण जमा झाले. या गुणांच्या जोरावर महाराष्ट्र संघाला रौप्य पदक प्राप्त झाले. महाराष्ट्र संघातील पाच जणींमध्ये जयसिंगपूरच्या (जि. कोल्हापूर) दिव्या पाटील व दिशा पाटील या जुळ्या बहिणींचा समावेश आहे. त्यांनी महाराष्ट्र संघाला रौप्य पदक मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
दरम्यान, तीन दिवस सुऊ राहिलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात भारतातील 28 राज्य शालेय संघांनी प्रतिनिधीत्व केले. अग्रमानांकित महाराष्ट्र संघाच्या कर्णधार पदाची धुरा दिव्या पाटील हिच्याकडे सोपवली होती. तसेच संघात दिव्यासह दिशा पाटील (जयसिंगपूर), अनुष्का कुतवल (पुणे), सनिधी भट, भाविनी मलिक (दोघी मुंबई) या पाच जणींचा समावेश होता. क्लासिकल स्वरूपात स्विस लीग सांघिक पद्धतीने एकूण सहा फेऱ्यांमध्ये राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा झाली. यात महाराष्ट्र संघाने आपल्या पहिल्या फेरीत हरियाणा संघाचा, दुसऱ्या फेरीत राजस्थान संघाचा, तिसऱ्या फेरीत सीबीएससी संघाचा तर चौथ्या फेरीत आंध्रप्रदेश संघाचा पराभव करून आठ गुण मिळवले. तसेच स्पर्धेमध्ये द्वितीय मानांकित केरळ संघासोबत संयुक्तपणे आघाडी घेतली होती.
पाचव्या फेरीतील केरळ संघाविऊद्धची तर अखेरच्या सहाव्या फेरीतील गुजरात संघाविऊद्धची लढत मात्र महाराष्ट्र संघाला बरोबरीत सोडवावी लागली. त्यामुळे या दोन्ही फेरीतून महाराष्ट्र संघाला प्रत्येकी 1 गुण मिळाला. त्यामुळे महाराष्ट्र संघाच्या खात्यात 10 गुण जमा झाले. त्यामुळेच संघाला रौप्य पदक मिळाले. केरळ संघाने सीआयएसई संघाला पराभूत करत अकरा गुणांसह सुवर्णपदकावर कब्जा केला. तसेच गुजरात संघानेही नऊ गुणांसह कांस्यपदक मिळवले. महाराष्ट्र संघातील दिव्या पाटील व दिशा पाटील या जुळ्या बहिणी जयसिंगपुरातील जयप्रभा इंग्लिश मीडियम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थींनी आहेत. त्यांना प्राचार्य स्मिता पाटील, क्रीडा शिक्षक राहुल सरडे, प्रशिक्षक सुमुख गायकवाड, महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक प्रवीण ठाकरे, चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भरत चौगुले व सचिव मनिष मारुलकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.