For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जयेशची झेप अन् अधिकाऱ्यांची झोप!

11:27 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
जयेशची झेप अन् अधिकाऱ्यांची झोप
Advertisement

तब्बल दोनवेळा खंडणीसाठी धमक्या : मोठ्या उद्योगपतींना घेरण्याची तयारी, कारागृहातील साथीदारांची फूस

Advertisement

बेळगाव : भर न्यायालय आवारात देशविरोधी घोषणा देणाऱ्या कैद्यामुळे हिंडलगा मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा ठळक चर्चेत आले आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना गेल्यावर्षी तब्बल दोनवेळा खंडणीसाठी धमक्या देणाऱ्या जयेश ऊर्फ शाकीरने देशातील मोठ्या उद्योगपतींना धमकावण्यासाठी तयारी केली होती, अशी माहिती उजेडात आली आहे. गेल्यावर्षी 14 जानेवारी 2023 रोजी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयाशी संपर्क साधून 100 कोटी खंडणीची मागणी केली होती. या प्रकरणाची महाराष्ट्र एटीएस, कोल्हापूर व नागपूर पोलिसांकडून चौकशी सुरू असतानाच 21 मार्च 2023 रोजी दुसऱ्यांदा नितीन गडकरी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून जयेशने पुन्हा खंडणीसाठी धमकावले होते.

पोलिसांनी धमकीच्या फोन कॉलचे मूळ शोधले असता हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातून हा फोन कॉल आल्याचे उघडकीस आले होते. कधी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम तर कधी छोटा शकीलचे नाव सांगत तो अधूनमधून धमकावण्याचा प्रकार करीत असतो. नागपूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता हिंडलगा कारागृहातून बाहेर पडण्यासाठी आपण असे कृत्य केल्याची कबुली त्याने दिली होती. धमकी प्रकरणाच्या चौकशीदरम्यान जयेशला नागपूर कारागृहात ठेवले होते. त्याने तेथेही आपल्या कारनाम्याने अधिकाऱ्यांना चांगलेच पीडले होते. 23 मार्च 2023 रोजी स्थानिक पोलिसांच्या मदतीने कारागृह अधिकाऱ्यांनी जयेशच्या बराकीची झडती घेतली होती. त्यावेळी त्याच्याजवळ मोबाईल फोन व सीमकार्ड आढळून आले होते. जयेशने स्वत:च अधिकाऱ्यांकडे मोबाईल सुपूर्द केला होता.

Advertisement

कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांनीही जयेशविरुद्ध 17 जानेवारी 2023 रोजी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला होता. या सर्व प्रकरणांची चौकशी सुरू असतानाच जयेशने बुधवारी सकाळी भर न्यायालय आवारात देशविरोधी घोषणा देऊन अतिरेक केला आहे. त्याची एकंदर पार्श्वभूमी लक्षात घेता ठळक चर्चेत येण्यासाठी किंवा कारागृह व्यवस्थापनाला अडचणीत आणण्यासाठी तो अधूनमधून असे कारनामे करीत असतो. खून व दरोडे प्रकरणात त्याला न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. 13 ऑक्टोबर 2017 रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने जयेशची फाशी रद्द करून जन्मठेप कायम केली. कारागृहात राहूनच कारागृहाबाहेरील गुन्हेगारी जगताशी संधान बांधणाऱ्या जयेश पुजारीने 21 एप्रिल 2018 रोजी बेळगाव उत्तर विभागाचे तत्कालिन पोलीस महानिरीक्षक व सध्याचे अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक अलोककुमार यांनाही धमकावले होते. याच प्रकरणाच्या सुनावणीसाठी जयेशला हिंडलगा कारागृहात स्थानबद्धतेत ठेवण्यात आले होते. बुधवारी सकाळी या खटल्याच्या कामकाजाला हजर राहण्यासाठी पोलिसांनी त्याला बेळगावला आणले होते. त्यावेळी ‘पाकिस्तान झिंदाबाद’ची नारेबाजी करण्यात आली आहे.

जयेश पुजारीने धर्मांतर केल्याचेही सामोरे...

उपलब्ध माहितीनुसार गेल्या एक-दोन महिन्यांपासून कारागृहात जयेश ऊर्फ शाकीरच्या हालचाली वाढल्या आहेत. त्याचे काही सहकारी यासाठी त्याला भरीस घालत आहेत. बुधवारी सकाळी घडलेल्या या निंद्य घटनेनंतर सायंकाळी बेळगाव पोलिसांचे एक पथक कारागृहात दाखल झाले आहे. या पथकातील अधिकाऱ्यांनी संपूर्ण कारागृहाची तपासणी सुरू केली असून याच कारागृहातून दाऊद इब्राहिमच्या काही सहकाऱ्यांशीही फोनवरून संभाषण झाल्याचा संशय बळावला आहे. असे एखादे प्रकरण घडल्यानंतर कारागृहात जामर बसविण्याचा मुद्दा ठळक चर्चेत येतो. नंतर साऱ्यांनाच त्याचा विसर पडतो. ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणारा जयेश पुजारीने धर्मांतर केल्याचेही सामोरे आले आहे.

Advertisement
Tags :

.