कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जतेत जयंत पाटलांची मायक्रो इनिंग

02:03 PM Sep 09, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

 जत / किरण जाधव :

Advertisement

जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील विरूध्द भाजपाचे फायरब्रंड आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अलिकडे पडळकर यांनी जयंत पाटलांना चांगलेच लक्ष्य केले असताना जयंतरावांनी देखील जतेत तितकेच लक्ष घातल्याचे स्पष्ट दिसत आहेत. जतमध्ये त्यांचे दौरे वाढले असून, त्यांनी इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह पक्ष बांधणीवर मोठे लक्ष केंद्रीत केले आहे. यामुळे आपसूकच जतमधील शरद पवारांची राष्ट्रवादी चांगलीच रिचार्ज झाली असून त्यांच्या पक्षाच्या मोर्चेबांधणीला देखील वेग आला आहे.

Advertisement

जतेत अलिकडच्या कांही वर्षात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी मरगळ आली होती. मागे महाविकास आघाडीची सत्ता असताना जयंत पाटलांचे जतकडे अधिकचे लक्ष होते. इथल्या ६५ गावांच्या पाणी योजनेसाठी त्यांनी वारणा खोऱ्यातून पाणी आरक्षण करीत मोठा प्रश्न सोडवला. म्हैसाळ विस्तारीत योजनेला मूर्त स्वरूप देत ती मार्गी लावण्याचे काम हाती असतानाच, राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर मात्र पुन्हा जतेत मोठ्या पवारांच्या राष्ट्रवादीत मरगळ आली. त्यातच अनेकांनी पक्ष सोडला. राज्याच्या राजकारणा सोबत जिल्ह्याच्या राजकारणाची कुस बदलली. याचे पडसाद तालुक्यातील गावोगावी उमटले.

एककाळ असा होता की, जयंतराव सांगतील ती पूर्व दिशा. इतकी ताकद त्यांनी जतेच्या गावागावांत निर्माण केली होती. परंतु त्यांच्याकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद असल्याने त्यांना जतसह जिल्ह्यात बारकाईने लक्ष देणे शक्य होत नव्हते. याचा परिणाम देखील जिल्ह्यात त्यांच्या पक्षावर झाला. जतेतही तेच घडले. जो तालुका स्व. राजारामबापू, वसंतदादा, पतंगराव कदम यांच्यावर जिवापाड प्रेम करायचा, तो तालुका आटपाडीतून आलेल्या गोपीचंद पडळकर यांनी अवघ्या सहा महिन्यात काबीज केला. मोठी क्रेझ त्यांनी या तालुक्यात निर्माण करत प्रस्थापित राजकारणाला मोठा हादरा देण्याचे काम केले.

पडळकर केवळ इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी जयंत पाटलांनाच टार्गेट केले. अलिकडे तर या दोन्ही नेत्यांमध्ये जहरी शाब्दिक वार सुरू झाले आहेत. मागच्या महिन्यात जत दौऱ्यावर असणाऱ्या जयंतराव यांनी थेट बोटचोरीचा मुद्दा उपस्थित करत पडळकरांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. त्यानंतर पडळकरांच्या पलटवारावर जयंतरावांनीही पुन्हा एका कार्यक्रमात आ. गोपीचंद यांना जिव्हारी लागणाऱ्या मुद्दधावर निशाना साधला. हा राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगला असतानाच, आता पुन्हा जयंतरावांनी आणखीन जोर लावत जतकडे नुसती नजर नाही तर मायक्रो प्लॅनिंगची इनिंग सुरू केली आहे.

जत तालुक्यात जयंत पाटील यांना माननारा मोठा वर्ग आहे. ख. राजारामबापू यांनी जतसाठी खूप मोठे योगदान दिले होते. तोच वारसा जपत जयंत पाटील यांनीही जतेसाठी सातत्याने मदतीचा ओघ सुरू ठेवला. पण राजकारणात कांहीकाळ गणितं बिघडतात, त्या पध्दतीने जतमध्येही त्यांच्या पक्षाची पडझड झाली. त्यात याच मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे पडळकर सातत्याने त्यांच्यावर आरोप करत आहेत. त्यामुळे जतेच्या राजकारणाला आता चांगलाच रंग चढतानाचे चित्र दिसते आहे. जयंत पाटील यांनी जतेत बारकाईने लक्ष घालत इथे पक्षाची ताकद वाढवण्याचे जोरदार प्रयत्न केले आहेत. थेट जनतेत जात मायक्रो प्लॅनिंग, गाव पातळीवराच्या नेत्यांच्या भेटी, पक्षाला बळ, नेत्यांना ताकद देण्याची भूमिका घेतली आहे. यातूनच अलिकडे जतेत मोठ्या पवारांच्या राष्ट्रवादीत नवचैतन्य निर्माण झाले आहे.

जतच्या राजकारणातला आक्रमक आणि बहुजनांचा नेता, अशी वेगळी ओळख असणारे ज्येष्ठ नेते सुरेशराव शिंदे, अभ्यासू व चाणक्य नेते म्हणून ओळखणारे जिल्हा बँकेचे संचालक मन्सूर खतीब, धनगर समाजातील फर्डा वक्ता, विवेवकवादी तरूण चेहरा तथा राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे यांच्याकडे मोठी जबाबदारी त्यांनी सोपवली आहे. तालुक्यात समविचारी पक्ष, संघटनांची बांधणी व थेट लोकसंवादावर भर देण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी दिलेत. त्यामुळे जतेत राष्ट्रवादी चांगलीच चर्चेत आली आहे.

आज जयंत पाटील संख, उमदी, जत शहराच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी नऊ वाजल्यापासून रात्रीपर्यंत ते जतेत तळ ठोकणार आहेत. संख येथे सोसायटी इमारत उद्घाटन, पदाधिकारी भेटी, उमदीत चार झेडपी गटाचा संवाद मेळावा तर सायंकाळी शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा व बैठका, असा कार्यक्रम त्यांनी लावला आहे. त्यामुळे या दौऱ्याला मोठे महत्व आले आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article