'पाठ केलेलं भाषण असलं की असं होतं, पुढच्या वेळी अभ्यास करून या'; आमदार पडळकरांच्या चुकीवर बोट ठेवत सुनावले खडे बोल
पडळकरांचा ऐतिहासिक दाखला; जयंत पाटलांचे प्रत्युत्तर
भाषणात पडळकर यांनी ‘घरात घुसून कार्यक्रम करायचा असतो’ असे विधान केले. यावेळी त्यांनी शनिवारवाड्यात शाहिस्तेखानाची बोटे छाटण्याच्या ऐतिहासिक प्रसंगाचा उल्लेख केला. तसेच अफजलखान मोठी फौज घेऊन आला होता, मात्र महाराजांनी त्याचा कोथळा फाडला, असा संदर्भ दिला.
पडळकरांच्या या वक्तव्याला उत्तर देताना जयंत पाटील यांनी संयम आणि संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. ‘आपण कधी चिडायचे नसते, आपली संस्कृती सोडायची नसते आणि आपल्याकडे आलेल्या माणसाला सन्मानाने परत जाण्याची व्यवस्था करायची,’ असे सांगत त्यांनी पडळकरांना टोला लगावला.
‘पुढच्या वेळी अभ्यास करून या’
यानंतर जयंत पाटील यांनी शिवरायांच्या इतिहासातील संदर्भावरून पडळकरांच्या वक्तव्याची दुरुस्ती केली. अफजलखानाचा कोथळा पन्हाळगडावर नाही, तर प्रतापगडावर बाहेर काढण्यात आला होता, असे स्पष्ट करत त्यांनी पडळकरांना सुनावले.
‘पुढच्या वेळी येताना अभ्यास व्यवस्थित करून या,’ असे म्हणत जयंत पाटील यांनी पडळकरांवर निशाणा साधला. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमस्थळी राजकीय चर्चेला उधाण आले.
एकाच मंचावर दोन विरोधक; राजकीय चर्चेला रंग
जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर हे सांगली जिल्ह्यातील राजकारणात परस्परविरोधी भूमिका घेणारे नेते म्हणून ओळखले जातात. अशा दोन नेत्यांची एकाच मंचावर उपस्थिती आणि त्यात शिवरायांच्या इतिहासावरून झालेली शाब्दिक चकमक यामुळे लोकार्पण सोहळ्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पुतळा लोकार्पणाच्या कार्यक्रमात ऐतिहासिक संदर्भावरून झालेल्या या टोलेबाजीने उपस्थितांचे लक्ष वेधले. जयंत पाटील यांनी पडळकरांना दिलेले प्रत्युत्तर आणि इतिहासातील संदर्भाची केलेली दुरुस्ती यांची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.