'जिकडे महाडिक तिकडे गुलाल', पाटलांसमोर BJP चे चॅलेंज, कोण मारणार बाजी?
शहरातील शिंदे गटाचे अस्तित्व संपते की काय? कार्यकर्त्यांना चिंता कायम
By : सुनील पाटील
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा भाजपाचे नेते राहूल महाडिक यांनी भारतीय जनता पार्टी आष्टा नगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे सांगून दोन्ही राष्ट्रवादीत खळबळ उडवून दिली आहे. यामुळे येणाऱ्या पालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीसमोर अर्थात आ. जयंतराव पाटील आणि निशिकांत पाटील यांच्यासमोर भाजपाचे कडवे आव्हान असणार आहे.
आष्टा नगरपालिकेत स्वर्गीय विलासराव शिंदे आणि आमदार जयंतराव पाटील गट सातत्याने सत्तेत राहिला आहे. काँग्रेस तसेच स्थानिक गटांनी शिंदे आणि पाटील गटाविरोधात पालिका निवडणुकीत अनेक वेळा दोन हात केले पण अपेक्षेप्रमाणे विरोधकांना यश मिळाले नाही. गत निवडणुकीत विरोधी गटाचे तीन तर अपक्ष तीन उमेदवार विजयी झाले.
स्वर्गीय विलासराव शिंदे आणि स्वर्गीय नानासाहेब महाडिक यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे स्वर्गीय नानासाहेब महाडिक यांनी आष्टा पालिका निवडणुकीत सहभाग घेतला नव्हता. त्याचा फायदा शिंदे पाटील गटाला वेळोवब-`ळी झाला. स्वर्गीय नानासाहेब महाडिक यांना मानणारा आमा शहरात मोठा गट आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक यांनी काही वर्षात हा गट अधिकच भक्कम केला आहे.
नेते व कार्यकर्त्यांच्या पायाला भिंगरी
आष्टा शहरात नगरपालिका निवडणुकीचे बारे बाहू लागले आहेत. सप्टेंबर अथवा ऑक्टोबर मध्ये निवडणुका होण्याची दाट शक्यता असली तरी विविध पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आतापासूनच पायाला भिंगरी बांधली आहे.
कोणत्याही परिस्थितीत पालिका निवडणूक जिंकायचीच या इराद्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, राष्ट्रवादी अजितदादा गट, भाजपा, शिवसेना शिंदे गट, काँग्रेसच्या पदाधिकायांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. पालिकेसाठी इच्छुक असणाऱ्या अनेकांनी मतदारांना आपले करण्यासाठी आत्तापासून सुरुवात केली आहे.
जयंतराव पाटील गटाचे श्रेष्ठी तसेच तरुण कार्यकर्त्यांनी आपल्या गटाचा ठसा उमटवण्याचे काम सुरू केले आहे. विविध आंदोलने, सार्वजनिक कार्यक्रम या माध्यमातून जयंतराव पाटील गटाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या गटामध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. कार्यकर्त्यांना नेते अधिक झाल्याने गटापुढील डोकेदुखी वाढली आहे.
दुसरीकडे स्वर्गीय विलासराव शिंदे गटाची शहरात मोठी वाताहात झाली आहे. शहराच्या सत्तेच्या केंद्रस्थानी असणारा शिंदे गट गेल्या वर्षभरात अस्तित्वहीन झाला आहे. गटाचे प्रमुख नेते वैयक्तिक कामात, संस्था चालवण्यात, शेती सांभाळण्यात, व्यवसाय भक्कम करण्यात गुंतले आहेत.
एकेकाळी शहराचे नेतृत्व करणारे शिंदे गटाचे नेते सार्वजनिक कार्यक्रमात व्यासपीठावर दुसऱ्या लाईनमध्ये तसेच महिलांच्या पहिल्या लाईन मध्ये बसतानाचे चित्र पाहायला मिळाले आहे. त्यामुळे शहरातील शिंदे गटाचे अस्तित्व संपते की काय? अशी चिंता शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना लागली आहे.
निशिकांतदादा पाटील गटाने निवडणुकीसाठी मोठी तयारी केली आहे. गेली तीन ते चार वर्षे शहरात निवडणुकीच्या दृष्टीने पेरणी केली आहे. पालिकेत सत्तांतर करायचेच या इराद्याने निशिकांतदादा पाटील गट शहरात कार्यरत राहिला आहे. हा गट राष्ट्रवादी अजितदादा गटात सामील झाल्याने या गटाची थोडीशी ताकद कमी झाली आहे.
जिल्हाध्यक्ष आनंदराब पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाचे नेते विविध सामाजिक उपक्रमातून कार्यरत आहेत. शिंदे गटाच्या शिवसेनेचेही जोरदार तयारी सुरू आहे. काँग्रेसचे नेते मंडळीही गटाचे अस्तित्व टिकवून आहेत. पालिका निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसच्या इच्छुकांचे प्रयत्न सुरु आहेत.
शिंदे पाटील गट यावेळीही एकत्रित लढणार आहे. निशिकांतदादा गटाचा विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न राहणार आहे. मात्र भाजपाचे नेते राहुल महाडिक यांनी स्वबळावर लढणार असल्याचा नारा दिल्याने दोन्ही राष्ट्रवादीमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाजपा आणि राहुल महाडिक यांच्या रूपाने दोन्ही राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान उभे असणार आहे. महाडिक गटाचे (भाजपाचे) आव्हान पेलताना दोन्ही राष्ट्रवादीची दमछाक होणार आहे. राहुल महाडिक यांनी शहरात मोठे संघटन केले आहे.
निशिकांत पाटील राष्ट्रवादीत गेल्याने भाजपाचे तयार झालेले संघटन राह-ल महाडिक यांना मिळाले आहे. त्यामुळे शहरात भाजपाची ताकद वाढली आहे. दोन्ही राष्ट्रवादी आपापसात भांडण्यात व्यस्त आहेत. याचा फायदा भाजपाला निश्चितपणे होणार आहे.
जिकडे महाडिक... तिकडे गुलाल
वाळवा आणि शिराळा तालुक्यात महाडिक गटाची मोठी ताकद असल्याने जिकडे महाडिक... तिकडे गुलाल हे समीकरण रुजू झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक असो. विधानसभा निवडणूक असो अथवा लोकसभेच्या निवडणुका असो जिकडे महाडिक असतात तिकडे निश्चितपणे गुलाल मिळत असतो. या समीकरणाचा प्रत्यय सांगली जिल्ह्याला अनेक वेळा आला आहे.
त्यामुळे महाडिक गटाचे महत्व जिल्ह्याच्या राजकारणात अधोरेखित झाले आहे. राहुल महाडिक यांनी आष्टा पालिकेत स्वबाळाचा नारा दिल्याने गुलालाचे समीकरण दोन्ही राष्ट्रवादीला माहीत असल्याने दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची घडधड वाढली आहे. आष्टा पालिका निवडणुकीतही गुलालाचे समीकरण सत्य ठरल्यास नवल वाटायला नको.