सावंतवाडीत आजपासून जयानंद मठकर व्याख्यानमाला
मठकर स्मृती पुरस्कार डॉ. महेंद्र मोहन यांना जाहीर
सावंतवाडी : प्रतिनिधी
श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन सावंतवाडी आणि सावंतवाडी सहकारी पतपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य सैनिक जयानंद मठकर व्याख्यानमाला २०२६ मंगळवार ७ एप्रिल ते शनिवार ११ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. श्रीराम वाचन मंदिर सभागृहात रोज सायंकाळी सहा वाजता व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटन मंगळवार ७ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता कोल्हापुर येथील प्रकाशक सुरेश शिरपूरकर यांच्या हस्ते होणार आहे. ७ एप्रिलला व्याख्यानमालेचे उद्घाटन व पुरस्कार वितरण होणार आहे.या व्याख्यानमालेत मंगळवार ७ एप्रिल डॉक्टर रुपेश पाटकर यांचे 'बॅ. नाथ पै यांचे विचार आणि आजचे समकालीन वास्तव' या विषयावर व्याख्यान होणार आहे. बुधवार ८ एप्रिल रोजी पुणे येथील मेधा पुरव- सामंत यांचे 'महिला सक्षमीकरणाची पन्नास वर्षे' या विषयावर व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या वंदना करंबेळकर आहेत. गुरुवार ९ एप्रिल रोजी पुणे येथील सुभाष वारे यांचे 'संविधान आपल्या जगण्याचा आधार' या विषयावर व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी कवी वीरधवल परब उपस्थित राहणार आहेत. शुक्रवार १० एप्रिल रोजी कोल्हापूर येथील डॉ. व्ही. एन. शिंदे यांचे 'जंगल प्रदूषण मानवाला संपवेल' या विषयावर व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी बांदा येथील कॉलेजचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर आहेत. तर ११ एप्रिल रोजी अहिल्यानगर येथील आनंद शितोळे यांचे 'आमच्या धडावर आमचे डोके' या विषयावर व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी निवृत्त माहिती उपसंचालक सतीश लळीत आहेत.यंदा मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणचा पुरस्कार ओणी-राजापूर येथील वात्सल्य मंदिरचे संस्थापक डॉ. महेंद्र मोहन यांना प्रदान करण्यात येणार आहे. सुरेश शिपुरकर यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण होणार आहे. यावेळी नाथ पै सेवांगणचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.