भालाफेकधारक मनुवर 4 वर्षांची बंदी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आशियाई चॅम्पियनशिप क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक मिळविणारा भारताचा अॅथलिट डी. पी. मनु उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने त्याच्यावर नाडाने 4 वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
बेंगळूरमध्ये 2023 च्या एप्रिलमध्ये झालेल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत मनुची उत्तेजक चाचणी घेण्यात आली होती. त्याच्या मुत्रल नमुन्यामध्ये निर्बंध घातलेले द्रव आढळल्याचे सांगण्यात आले. क्रीडा क्षेत्रात बळकट स्नायु करण्यासाठी खेळाडू निर्बंध घातलेले मिथाईल टेस्टो हे उत्तेजक द्रव वापरतात. या द्रवावर उत्तेजक चाचणीविरोधी एजन्सीने बंदी घातली आहे. या एजन्सीतर्फे निर्बंध घातलेल्या द्रवांची यादी यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. डी. पी. मनुच्या बंदी कालावधीला 24 जूनपासून प्रारंभ होत आहे. गेल्यावर्षी झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी 25 वर्षीय मनुची विश्व मानांकन कोटापद्धतीनुसार निवड होऊ शकली नाही. त्यामुळे या स्पर्धेत निरज चोप्रा आणि किशोर जेना यांची निवड झाली होती. 2022 च्या जूनमध्ये झालेल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत डी. पी. मनुने 84.35 मी.चे भालाफेक करुन दर्जेदार कामगिरी केली होती. भालाफेक प्रकारातील डी.पी. मनु हा माजी राष्ट्रीय विजेता आहे.
क्रीडाक्षेत्रात उत्तेजक चाचणीत दोषी आढळणाऱ्या विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंवर नाडाच्या उत्तेजक विरोधी शिस्तपालन समितीला 2 ते 6 वर्षे कालावधीसाठी बंदी घालण्याचा अधिकार आहे. भारतीय क्रीडा क्षेत्रातील महिलांच्या रिलेत सहभागी होणारी सिमरजित कौर हिच्यावरही 4 वर्षांची बंदी त्याच प्रमाणे माजी कनिष्ट गटातील राष्ट्रीय चॅम्पियन हातोडाफेक धारक नितेश पुनीया याच्यावर दोन वर्षांसाठी तसेच कुस्ती क्षेत्रातील मल्ल नरिंदर चीमा यांच्यावरही दोन वर्षांची बंदी घालण्यात आली असल्याचे नाडाने सांगितले आहे. 3 एप्रिल 2024 रोजी भारताचा मुष्टीयोद्धा रविंद्र सिंग याच्यावरही 4 वर्षांची बंदी त्याच प्रमाणे महिला मुष्टीयुद्धी रेखा हिच्यावरही दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.