'गोकुळ'चं जातीवंत म्हैस विक्री केंद्र लयं भारी !
कोल्हापूर / धीरज बरगे :
गोकुळ आणि राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ (एनडीडीबी) यांच्या संयुक्त विद्यमाने केर्ली (ता.करवीर) येथे सुरु करण्यात आलेले जातीवंत म्हैस विक्री केंद्र लयं भारी असल्याची प्रतिक्रीया दूध उत्पादकांमधून उमटत आहे. या केंद्रास कोल्हापूरसह परजिल्हा व राज्यातील दूध उत्पादकांमधून वाढता प्रतिसाद मिळत आहे. केंद्रात आत्तापर्यंत हरियाणा राज्यातून आणलेल्या 82 पैकी 64 मुऱ्हा जातीच्या म्हैशींची विक्री अवघ्या चार महिन्यात झाली आहे. दूध उत्पादकांचा वाढता प्रतिसाद पाहता गडहिंग्लज अथवा आजरा तालुक्यातही म्हैस विक्री केंद्र सुरु करण्याचा विचार गोकुळ, एनडीडीबीकडुन सुरु आहे.
गोकुळकडुन विशेषत: जिल्ह्यातील म्हैस दूधाचे उत्पादन वाढविण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. जातीवंत म्हैस खरेदीसाठी 40 हजाराचे अनुदानही दिले जात आहे. त्यामुळे हरियाणा राज्यातून मुऱ्हा जातीच्या म्हैस खरेदी करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या वाढतच आहे. अशा दूध उत्पादकांना जातीवंत म्हैस खरेदी करणे सुलभ व्हावे, यासाठी गोकुळ व एनडीडीबी यांच्या संयुक्त विद्यमाने केर्ली येथे ऑक्टोबर 2024 मध्ये गोकुळ जातीवंत म्हैस विक्री केंद्र सुरु करण्यात आले.
येथील विक्री केंद्रात हरियाणा येथून मुऱ्हा जातीच्या म्हैशी विक्रीसाठी आणल्या जात आहेत. गोकुळच्या केंद्रास जातीवंत म्हैशींचा पुरवठा करण्यासाठी हरियाणा येथे एनडीडीबीच्या दोन डॉक्टरांचे पथक आहे. ते हरियाणामधील मुऱ्हा जातीच्या म्हैशींची पाहणी करुन त्यांच्या आवश्यक त्या आरोग्य तपासण्या तेथेच करुन म्हैशींची निवड करतात. मग या म्हैशी तपासणीच्या संपूर्ण रेकॉर्डसह केर्ली येथील केंद्रामध्ये विक्रीसाठी आणल्या जातात. त्यामुळे दूध उत्पादकांना म्हैस खरेदी करताना संबंधित म्हैशीचे संपूर्ण रेकॉर्डही पाहयला मिळत आहे. यामुळे दूध उत्पादक खात्रशीररित्या येथून म्हैस खरेदी करु शकत आहेत.
- 10 ते 16 लिटरपर्यंत दूध देणाऱ्या म्हैशी
केंद्रामध्ये आत्तापर्यंत 82 म्हैस विक्रीसाठी आणल्या होत्या. त्यापैकी 64 म्हैशींची विक्री झाली आहे. प्रतिदिन 10 ते 16 लिटरपर्यंत दूध देणाऱ्या म्हैशी येथे आहेत. सद्यस्थितीत केंद्रामध्ये सुमारे 22 ते 24 म्हैशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर नवीन नऊ ते दहा म्हैशी लवकरच केंद्रामध्ये येणार आहेत.
- 1 लाख 20 हजार रुपयांपासून पुढे किंमत
केंद्रात किमान दहा लिटर दूध देणाऱ्या म्हैशीची किंमत 1 लाख 20 हजार रुपये निश्चित केली आहे. सुमारे 16 लिटरपर्यंत दुध देणाऱ्या म्हैस येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. दहा लिटरहुन अधिक दूध देणाऱ्या म्हैशींची किंमत प्रतिलिटर तीन हजार रुपयांप्रमाणे वाढत जाणार आहे.
- परजिल्हा, राज्यातूनही मागणी
केर्ली येथील केंद्रास कोल्हापूर जिल्ह्यासह परजिल्हा व राज्यातूनही मागणी वाढत आहे. आत्तापर्यंत गोवा राज्यात दोन, सांगली जिल्ह्यात सहा तर कोकणात पाच म्हैशींची विक्री केंद्रामधून झाली आहे.
- केंद्रातून म्हैस खरेदी केल्यास 30 हजार अनुदान
गोकुळ सलग्न दूध उत्पादकांना हरियाणा येथून जातीवंत म्हैस खरेदीसाठी गोकुळकडून 40 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. गोकुळच्या केर्ली येथील केंद्रातून म्हैस खरेदी केल्यास प्रवास खर्च वेळेची बचत होणार आहे. केर्ली येथील केंदातूनही म्हैस खरेदी केल्यास संबंधित उत्पादकाला 30 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
- अल्पावधीतच विश्वास संपादन
गोकुळ म्हैस विक्री केंद्रात म्हैस खरेदीसाठी येणाऱ्या दूध उत्पादकास संबंधित म्हैशीचे संपूर्ण रेकॉर्ड दाखवले जाते. तसेच म्हैस धार किती देते याची खात्री प्रत्यक्षात करता येते. त्यामुळे गोकुळचे म्हैस विक्री केंद्रा खात्रीशीर म्हैस खरेदीचे केंद्र बनले आहे. कोल्हापूरसह आता सांगाली, सातारा, कोकण आणि गोवा राज्यातील दूध उत्पादक केंद्रास भेट देत आहेत. वाढता प्रतिसाद पाहता अल्पावधीतच गोकुळ म्हैस विक्री केंद्राने दूध उत्पादकांचा विश्वास संपादन केला आहे.
डॉ. यु. व्ही. मोगले, कन्सलटंट, गोकुळ म्हैस विक्री केंद्र
- आजरा, गडहिंग्लज येथे केंद्र सुरु करण्याचा विचार
आजरा, गडहिंग्लज, भूदरगड तालुका, सीमाभाग आणि गोवा राज्यातील दूध उत्पादकांना केर्ली येथील केंद्राचे अंतर लांब पडत आहे. त्यामुळे या भागातील दूध उत्पादकांनाही जातीवंत म्हैस खरेदी करणे सहजसोपे व्हावे, यासाठी गडहिंग्लज अथवा आजरा परिसरात केर्लीप्रमाणे म्हैस विक्री केंद्र सुरु करण्याचा विचार गोकुळकडुन सुरु आहे.
अरुण डोंगळे, चेअरमन गोकुळ दूध संघ