Jat news : जत तालुका हादरला! अनैतिक संबंधाला विरोध केल्याने पतीवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला
जत तालुक्यातील आसंगीमध्ये खुनी हल्ल्याने खळबळ
उमदी: पत्नीच्या अनैतिकसंबंधाच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीवर कुहाडीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आसंगी (ता. जत) येथे फिर्यादीच्या घरासमोर हा प्रकार घडला असून, या घटनेत फिर्यादीगंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मायप्पा पांडू लोखंडे (रा. आसंगी, ता. जत) हे आपल्या घरी जात असताना आरोपी तायप्पा यमगार (रा. आचकनहल्ली, ता. जत) याने त्यांचा पाठलाग केला. आरोपीचा फिर्यादीच्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधांना फिर्यादीकडून विरोध होत होता. याच रागातून आरोपीने फिर्यादीच्या घरासमोरच त्यांच्यावर कुऱ्हाडीने डोक्यात बार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यात फिर्यादी मायप्पा लोखंडे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, जत पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.