जत उपअधीक्षकांसह पाच जणांना कारणे दाखवा नोटीस संजयनगर, स्थानिक गुन्हे शाखा, विशेष शाखेचाही समावेश
| त. भा. प्रतिनिधी
सांगली : जतमधील गोळीबार आणि वेदांत बंडगर खून प्रकरणात आता जतचे पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले यांच्यासह चार निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी हे आदेश दिले. तातडीने खुलासा करा, असे आदेशही देण्यात आले आहेत. जतचे तत्कालीन निरीक्षक संदीप कोळेकर, संजयनगरचे निरीक्षक सतीश कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे आणि विशेष शाखेचे तत्कालीन निरीक्षक संजय मोरे यांना ही नोटीस दिली आहे.
जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुख्यात गुंड निलेश गडदेने लक्ष्मण खरात यांच्या घरात घुसून धमकी देत खंडणी मागितली. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या दरात तो आला होता. त्यानंतर त्याने सांगलीत वेदांत बंडगर यांची गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर समाजात संतापाची लाट उसळली. जत पोलिसांनी वेळीच कारवाईचा बडगा उगारला असता तर खून टळला असता, अशी भूमिका समाजात उमटली.
या प्रकरणांनंतर जत उपाधीक्षक सचिन थोरबोले यांची भूमिका स्पष्ट झाली नाही. पोलीस ठाण्याच्या शेजारी असणाऱ्या कार्यालयात त्यांचा कारभार चालतो. तरीही त्यांनी चकार शब्द काढला नाही. त्यामुळे त्यांनाही नोटीस दिली आहे. तसेच निरीक्षक कोळेकर यांनी वेळीच कारवाई केली असती, तर अनर्थ टळला असता, अशी चर्चा सुरू झाली. त्यामुळे त्यांची बदली केली. संजयनगरचे निरीक्षक सतीश कदम, विशेष शाखेचे तत्कालीन निरीक्षक संजय मोरे आणि एलसीबीचे संजीव झाडे यांना नोटीस बजावली त्याचे उत्तर दिल्यानंतर आयजी कोणती कारवाई करतात हे समोर येईल.