जसप्रीत बुमराहचं ‘दशक’ !
भारतीय संघाचं बऱ्याच काळापासून गोलंदाजीतील प्रमुख अस्त्र बनलंय ते जसप्रीत बुमराह...तो खेळणार हे कळल्यानंतर बड्या बड्या प्रतिस्पर्धी संघाचे धाबे दणाणल्याशिवाय राहत नाहीत. याचा कारण त्याचा वेग, अचूक मारा नि गोलंदाजीची विचित्र शैली...परंतु त्यामुळंच त्याच्या पाठीमागं दुखापतीचा ससेमिरा लागलेला असून सतत खेळणं कठीण व्हायला लागलंय अन् त्याला अधूनमधून विश्रांती देण्याचा मार्ग संघ व्यवस्थापनाला चोखाळावा लागतोय...बुमराहच्या कारकिर्दीला नुकतंच दशक पूर्ण झालं असून त्यानिमित्तानं त्यावर टाकलेली नजर...
ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरानं आयोजित केलेली पाचवी एकदिवसीय लढत ते रायपूर येथील न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा टी-20 सामना...23 जानेवारी, 2016 ते 23 जानेवारी, 2026...एक दशक पाहता पाहता संपलंय...पण ‘त्याचा’ उत्साह अजिबात कमी झालेला नाहीये. दुखापतींशी लढत सातत्यानं चाललीय, सर्व लढती खेळणं शक्य होत नाहीये, परंतु ‘त्याचा’ वेग मात्र पूर्वीप्रमाणंच फलंदाजांना छळतोय...‘त्याची’ गोलंदाजीची विचित्र शैली नि हवं तेव्हा अचूक यॉर्कर्स घालण्याची क्षमता यांनी गेल्या 10 वर्षांत प्रत्येक विश्लेषकाला, समालोचकाला, स्तंभलेखकांना अक्षरश: चकीत केलंय...
‘त्याच्या’ कारकिर्दीची सुरुवात झाली ती 2013 सालच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये...विराट कोहलीनं गुजरातच्या त्या जलदगती गोलंदाजाला त्याच्या पहिल्याच षटकात तीन चौकार हाणले खरे, पण तो ‘त्याला’च आपली विकेट देऊन बसला...वेस्ट इंडिजचा माजी महान जलदगती गोलंदाज मायकेल होल्डिंग यांनी भविष्यवाणी केली होती की, ‘त्याला’ त्याच्या शैलीमुळं सातत्यानं खेळणं काही वर्षांनंतर जमणार नाहीये अन् ते खरं देखील ठरलंय...स्वत:चं भविष्य स्वत:च लिहिणाऱ्या त्या गोलंदाजाचं नाव...जसप्रीत बुमराह !...
जसप्रीत बुमराहनं आंतरराष्ट्रीय लढतींत खेळण्यास प्रारंभ केला तो ऑस्ट्रेलियातील पाचव्या एकदिवसीय लढतीपासून...आणि त्याला संधी मिळाली ती देखील अक्षरश: आश्चर्यकारकरीत्या...खरं म्हणजे जसप्रीतची निवड करण्यात आली होती ती कांगारुंविरुद्धच्या ‘टी-20’ सामन्यांसाठी. परंतु त्याला अॅडलेडला जाणाऱ्या विमानात स्थान मिळालं नाही अन् वास्तव्य करणं भाग पडलं ते सिडनीत. बुमराहला मात्र अतिशय आनंद झाला तो एकदिवसीय लढतीत खेळणाऱ्या वरिष्ठ भारतीय खेळाडूंचा सहवास मिळणार, त्यांचं कौशल्य पाहण्याची संधी मिळणार या विचारानं...
पण नियतीच्या मनात वेगळंच काही तरी दडलं होतं...भुवऩेश्व़र कुमारचा अंगठा मोडला नि अतिशय हुशार तत्कालीन भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं डावखुरा जलदगती गोलंदाज बरिंदर सरण याची निवड न करता संघात स्थान दिलं ते जसप्रीत बुमराहला. खरं म्हणजे निवड समितीनं एकदिवसीय लढतींसाठी ऑस्ट्रेलियाला पाठविलं होतं ते सरणला...धोनीनं गुजरातच्या त्या जलदगती गोलंदाजाच्या हातात सोपविली ती ‘ओडीआय कॅप नंबर 210’. विशेष म्हणजे जसप्रीतनं देखील कर्णधाराचा निर्णय योग्य ठरविला व 10 षटकांत 40 धावा देत ऑस्ट्रेलियाच्या दोन फलंदाजांना गारद केलं. त्यात समावेश होता तो कर्णधार स्टिव्ह स्मिथचा...
त्यानंतर मात्र बुमराहनं क्वचितच मागं वळून पाहिलंय...जेव्हा दौरा संपला तेव्हा एम. एस. धोनीनं त्याचं वर्णन केलं होतं ते ‘फाईंड ऑफ द टूर’ या शब्दांच्या साहाय्यानं...सिडनीत झालेली एकदिवसीय लढत संपल्यानंतर स्मिथनं मान्य केलं, ‘जसप्रीत बुमराहच्या शैलीमुळं चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त वेगानं बॅटच्या दिशेनं येतो आणि फलंदाजाला विचार करण्याची संधी देखील मिळत नाही. एखाद्या पारंपरिक वेगवान गोलंदाजापेक्षा तो पूर्णपणे वेगळा वाटतोय’...स्टिव्ह स्मिथ, ए. बी. डिsिव्हलियर्स, ज्यो रूट यांच्यावर बुमराहला अक्षरश: शरण येण्याची पाळी कित्येकदा आलीय ती त्यामुळंच. त्यानं क्रिकेटच्या प्रत्येक स्वरुपावर वर्चस्व गाजविलेलं असलं, तरी त्याला पहिल्यांदा खरी संधी मिळाली ती ‘टी-20’मधून...
बुमराह ‘इंडियन प्रीमियर लीग’मध्ये मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधीत्व करायचा आणि अजूनही करतोय. रोहित शर्मानं प्रत्येक लढतीत त्याचा वापर केला तो अतिशय चातुर्यानं...वेस्ट इंडिज व अमेरिका यांनी 2024 मध्ये संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या नि भारतानं जिंकलेल्या ‘टी-20 विश्वचषक’ स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धची लढत आपल्याला खात्यात जमा करणं शक्य झालं ते जसप्रीतच्या अप्रतिम कामगिरीमुळंच. त्यावेळी भारतीय संघाला अवघ्या 119 धावा नोंदविणं जमलं होतं. परंतु 14 धावांत 3 बळी मिळविणाऱ्या त्या अफलातून गोलंदाजानं 360 अंशांत सारं चित्र फिरविलं...
अंतिम लढतीतही दक्षिण आफ्रिकेला 30 चेंडूंत गरज होती ती 30 धावांची. आणि पॅव्हेलियनमध्ये परतले होते ते अवघे चार फलंदाज. पण यावेळी देखील रोहित शर्मानं धूर्तपणे जसप्रीत बुमराहच्या हातात चेंडू सोपविला आणि त्यानं स्पर्धेतील एका उत्कृष्ट चेंडूच्या साहाय्यानं खात्मा केला तो मार्को जॅनसेनच्या खेळीचा. त्यानंतर काय घडलं ते सर्वांनाच माहितंय...आता पुन्हा एकदा यजमानांचं सारं लक्ष केंद्रीत झालेलं असेल ते फेब्रुवारी-मार्च महिन्यांत भारत व श्रीलंका यांनी संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या ‘टी-20’ विश्वचषकातील बुमराहच्या कामगिरीवर. भारत मोहिमेला प्रारंभ करणार तो 7 फेब्रुवारीला वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या अमेरिकेविरुद्धच्या साखळी सामन्यानं...
2024 मधील स्पर्धेत जसप्रीतनं गोलंदाजी केली होती अवघ्या 4.17 इकोनॉमी रेटनं अन् ती ठरली पाच वा त्यापेक्षा जास्त सामने खेळलेल्या गोलंदाजांचा विचार केल्यास विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी...त्याचं सर्वांत मोठं वैशिष्ट्या म्हणजे लढतीच्या कुठल्याही टप्प्यावर मारा करण्याची क्षमता. भारताच्या दृष्टीनं दुखापतींनी सातत्यानं छळलेल्या त्या गोलंदाजाचं संघात असणं फार फार महत्त्वाचं. कारण 50 टक्के मानसिक लढाई जिंकण्याची क्षमता जसप्रीत बुमराह या नावातच लपलीय. तो न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत खेळला नाही आणि त्याची फार मोठी किंमत आम्हाला मोजावी लागली...महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा नि सूर्यकुमार यादव या कर्णधारांनी अडचणीच्या वेळी प्रत्येकदा पाहिलंय ते बुमराहच्या तोंडाकडेच. भारताला आता विश्वचषकात आवश्यकता आहे ती त्याच्या चमत्काराची...विश्लेषक नेहमी सचिन तेंडुलकरच्या पूर्वीची फलंदाजी व नंतरच्या फलंदाजांची कामगिरी यांची तुलना करतात. जसप्रीत बुमराहच्या बाबतीत सुद्धा तसं केल्यास ते अजिबात चुकीचं ठरणार नाहीये..
जसप्रीत बुमराह व इतर गोलंदाज यांच्यातील एक फार मोठा फरक म्हणजे बहुतेक सर्व गोलंदाज गोलंदाजीच्या रेषेच्या 10 सेंटीमीटर पुढं येऊन चेंडू टाकतात, तर बुमराह मात्र चक्क 34 सेंटीमीटर. हा 24 सेंटीमीटरचा फरकच त्याला फार भेदक बनवितोय...कपिल देव यांच्या समर्थकांच्या मते, 80 च्या दशकात जर बुमराह खेळला असता, तर त्याच्या शैलीमुळं फारसं क्रिकेट वाट्याला आलं नसतं. कारण त्या पद्धतीनं गोलंदाजी करण्यास त्याला एखाद्या प्रशिक्षकानं मान्यताच दिली नसती. पण क्रिकेट प्रचंड प्रमाणात बदललंय नि प्रगत ‘स्पोर्ट्स मेडिसिन’चा लाभ देखील त्याला मिळतोय हे नाकारता येणार नाहीये !
बुमराहचा दबदबा...
- 2024 : बुमराहनं 14.92 सरासरीनं 13 कसोटी सामन्यांत पॅव्हेलियनचा रस्ता दाखविला तो तब्बल 71 गोलंदाजांना. त्याचा ‘स्ट्राईक रेट’ होता 30.1...2024 मधील ती ठरली सर्वोत्तम कामगिरी. त्यानं पाच बळी मिळविले ते पाच वेळा...
- 12 जुलै, 2022 : ओव्हलवरील एकदिवसीय लढतीत इंग्लंडच्या सहा फलंदाजांना गारद केलं ते अवघ्या 19 धावांत. ती ठरली त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी. खेरीज कुठल्याही अन्य भारतीय गोलंदाजाला या कामगिरीवर मात करणं इंग्लंडच्या भूमीवर जमलेलं नाहीये..
- 2018 साली आपल्या पहिल्याच मोसमात बुमराहनं 9 कसोटी सामन्यांत 48 बळी मिळविले होते...
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपांत प्रत्येकी 100 हून बळी मिळविणारा जसप्रीत बुमराह हा एकमेव भारतीय गोलंदाज...अशी कामगिरी करून दाखविलीय ती त्याचा गुरू श्रीलंकेचा लसिथ मलिंगा, बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन, न्यूझीलंडचा टीम साऊदी आणि पाकिस्तानचा शाहिन शाह आफ्रिदी यांनी...

- राजू प्रभू