जसप्रीत बुमराह नंबर 1!
आयसीसीच्या गोलंदाजी क्रमवारीत बुमराहचा कारनामा : ऋषभ पंतची टॉप-10 मध्ये एंट्री, जैस्वाल चौथ्या स्थानी
वृत्तसंस्था/ दुबई
टीम इंडियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इतिहास घडवला आहे. बुमराहने सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पाचव्या आणि अंतिम तसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात 2 विकेट्स घेतल्या. बुमराहला या 2 विकेट्सचा फायदा आयसीसी टेस्ट रॅकिंगमध्ये झाला आहे. आयसीसीने नवी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. बुमराह या क्रमवारीत सरस ठरला आहे. बुमराहच्या रेटिंग पॉइंट्समध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत 1 अंकाने वाढ झाली. यासह बुमराहने त्याचं पहिले स्थान आणखी मजबूत केले आहे. याशिवाय, ऋषभ पंतने नववे स्थान पटकावले असून यशस्वी जैस्वालने चौथे स्थान कायम राखले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सततच्या खराब कामगिरीनंतर पंत टॉप 10 मधून बाहेर पडला होता. पण सिडनी कसोटीनंतर त्याने पुनरागमन केले आहे. पंतने आता 9 व्या क्रमांकावर कब्जा केला. ताज्या आयसीसी क्रमवारीत टॉप 5 फलंदाजांमध्ये कोणताही बदल झाला नाही. इंग्लंडचा जो रुट अव्वल स्थानावर कायम आहे. तर हॅरी ब्रूक 876 गुणांसह दुसऱ्या, न्यूझीलंडचा केन विल्यमसन 867 गुणासह तिसऱ्या, भारताची यशस्वी जैस्वाल 847 चौथ्या तर भारताविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये धडाकेबाज खेळ करणारा ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड 772 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
बुमराहच्या आसपास कोणीही नाही
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने कसोटीमधील सर्वोत्तम रेटिंग मिळवले आहे. बुमराह 908 रेटिंग गुणांसह जगातील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज आहे. बुमराहच्या नावे गेल्या आठवड्यात आयसीसी टेस्ट रॅकिंग जाहीर झाल्यानंतर 907 गुण होते. बुमराहने तेव्हा आर अश्विनचा (904 गुण) विक्रम मोडीत काढला होता. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स दुसऱ्या, आफ्रिकेचा रबाडा तिसऱ्या, ऑस्ट्रेलियाचा हेजलवूड चौथ्या स्थानी विराजमान आहे. सिडनी कसोटी गाजवणाऱ्या ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँडने टॉप 10 मध्ये धडक मारली आहे. बोलँडने 29 स्थानांची झेप घेतली आहे. बोलँड आणि रवींद्र जडेजा संयुक्तरित्या नवव्या स्थानी विराजमान आहेत.