ZP School: किर्र जंगल, वन्यप्राणी अन् जर्गी धनगरवाड्याच्या शाळेत शिकणारे 5 विद्यार्थी!
पटसंख्या किती यावर भर न देता सोय महत्त्वाची म्हणून शाळा 30 वर्षांपूर्वी सुरू केली.
By : सुधाकर काशीद
कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यातील जर्गी धनगरवाड्यात असलेल्या शाळेत फक्त पाच मुले व एक गुरुजी आहेत. सोमवारी शाळेचा पहिला आणि मुलांच्या स्वागताचा पहिला दिवस होता. सकाळपासून रपारपा पाऊस आणि धुके, त्यामुळे मुलं शाळेत येतील की नाही अशी शंका. पण एकेक करत आपल्या बापाच्या, आईच्या छत्रीतून ही मुले शाळेत आली.
शाळेच्या खोलीतील पताका, फुगे, रंगीत खडूने नटलेला फलक त्यामुळे ती भारावून गेली. सरांनी मुलांना टोप्या, फुगे दिले. संगीता ताईंनी मुलांची ओवाळणी केली. आणि या मुलांच्या भविष्याला आधार देणाऱ्या ग, म, भ, न ची सुरुवात त्या शाळेतून झाली. दिवसभर पावसांच्या धारांनी या मुलांच्या शाळेला साथ दिली.
एक गुरुजी आणि पाच विद्यार्थी असलेल्या जर्गीच्या धनगरवाड्यातील शाळेत पाचच मुलं कशी आणि फक्त पाच जणांसाठी ही एक शाळा कशी, हा साहजिकच बहुतेकांच्या मनात येणारा प्रश्न. पण कोल्हापूर जिल्हा परिषदेचे हेच वेगळेपण. त्यामुळे पटसंख्या किती यावर भर न देता सोय महत्त्वाची म्हणून ही शाळा 30 वर्षांपूर्वी सुरू केली.
जर्गी धनगरवाडा म्हणजे आजूबाजूला जंगल. रस्ता तर स्वातंत्र्यानंतर गेल्यावर्षी पहिल्यांदा डांबरी झालेला. धनगरवाड्यात १५ ते १६ घरे बाया-माणसं कायम पोटासाठी छोट्या छोट्या कामात गुंतलेली, अशी इथली परिस्थिती. जर्गीच्या या शाळेत पहिल्यापासून पटसंख्या कधी दोन अंकी संख्येवर गेली नाही. पण जिल्हा परिषदेने ही शाळा कधी बंद केली नाही. ही शाळा सुरूच ठेवली.
या परिसरातला पाऊस म्हणजे घराबाहेर पाय टाकू न देणारा. पण या शाळेला जिल्हा परिषदेचे इतके वेगळे शिक्षक मिळाले की अशा पावसातही शिक्षक शाळेला यायचे. मुलांना त्यांच्या घरातून आणून शाळेत शिकवायचे. आणि आजही चित्र तसेच आहे. हा धनगरवाडा जंगल परिसरात आहे. गवा रेडा तर येथे रोज दिसतो.
अरवल, बिबट्या यांच्या पायाचे ठसे अगदी सहज दिसतात. मुले गव्याला फार घाबरत नाहीत. पण या भागात असलेल्या अस्वलांना लहान मुलेच काय, तर मोठी माणसेही घाबरतात. आज सुनील, गौरी, राजवीर, अर्चना, आरोही ही पाच मुले शाळेत आली. यातील अर्चना व आरोही पहिलीला.
त्यामुळे नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत म्हणून त्यांना जोकर टोपी, फुगे, मिठाई देण्यात आली. धनगरवाड्यातील संगीता वहिनींनी त्यांचे औक्षण केले. धनगरवाड्यातील फक्त पाच मुलांसाठी पोषण आहार पुरवणारा कोणी ठेकेदार मिळत नाही. त्यामुळे या वाड्यातील महिलांनी या मुलांना मसाले भात, पोडे देण्यात कधी आळस केला नाही.
एक गुरुजी, पाच विद्यार्थी व एक गुरुजी, दोन विद्यार्थी असलेल्या या शाळा शिक्षण तज्ज्ञांनी पाहण्याची गरज आहे. शिक्षणाबद्दल बाहेर काहीही बोलता येते, उपदेश करता येतो पण जर्गी व कावळटेक येथील शाळा, तेथील शिक्षक, येथील विद्यार्थी, तेथील परिसर हे एकदा तज्ज्ञांनी खरोखर पाहणे गरजेचे आहे.
कावळटेक धनगरवाड्यावर एक गुरुजी, दोन विद्यार्थी
असाच एक धनगरवाडा गगनबावडा तालुक्यातीलच कावळटेक येथे आहे. तेथेही जिल्हा परिषदेची शाळा आहे. कावळटेकचे जंगल म्हणजे 'प्रोटेक्टेड फॉरेस्ट" या वर्गातले आहे. किमान चार किलोमीटर चालतच या जंगलात जावे लागते. या जंगलात बिबट्या, गवा, अरवल, रानकुत्री, डुक्कर हे प्राणी आहेत. आणि त्याहून विशेष है की या जंगलात बोडके दादा यांचे एक म्हणजे एकच घर आहे.
या कावळटेकमध्ये १५ वर्षांपूर्वी ३० ते ४० धनगर बांधव राहत होते. पण नवीन काहीतरी काम शोधण्यासाठी एक एक करत तेथून बाहेर पडले. आता फक्त आणि फक्त बोडके दादा, त्यांची पत्नी व त्यांच्या तीन लहान मुली आहेत. या जंगलातही जिल्हा परिषदेची शाळा आहे. तेथे एक गुरुजी, दोन विद्यार्थी अशी या शाळेची परिस्थिती आहे.
येथे मुली राहतात कशा, शिकतात कशा हाच ही शाळा पाहिल्यानंतर मनात येणारा प्रश्न आहे. पण येथे अगदी नियमीत शाळा सुरू आहे. आज फक्त पहिल्या दिवशी दोन्ही मुली तापाने आजारी असल्याने शाळेत येऊ शकल्या नाहीत. उद्या, परवा मात्र त्या शाळेत आल्यावर त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. राजेंद्र कागले व गजानन कांबळे हे शिक्षक या दोन धनगरवाड्यांवर सेवा बजावत आहेत.