For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

जरांगेंचा ऑडिओ बॉम्ब : महायुतीतील भूसुरुंग!

06:16 AM Oct 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
जरांगेंचा ऑडिओ बॉम्ब   महायुतीतील भूसुरुंग
Advertisement

प्रत्यक्ष राजकीय पक्षाच्या धडाकेबाज कामगिरीपेक्षा बारभाईचा कारभार कसा थयथयाट करतो आहे, आणि बाजारबुणग्यांच्या उपद्वापामुळे सळसळते जिवंत राजकीय पक्ष कसे बदनाम होत आहेत याचे एक जिवंत उदाहरण सध्याच्या राजकारणात दिसू लागले आहे. जिथे मराठा इतिहासातून उसण्या घेतलेल्या आनंदीबाईचे कथीत उपद्व्याप, नारायणरावाचा अंत, राघोबाला शह देणारा बारभाईंचा कारभार, राघोबाची इंग्रजांशी हातमिळवणी आणि साडेतीन शहाण्यांची कथीत मुत्सद्देगिरी या घटनांनी प्रेरित आजची मंडळी पडद्यामागून कारभार करत आहेत. अशा कारभाराचा शेवट अंतिमत: सत्ता कमकुवत होण्यात झाला. हा इतिहासाचा एकच धडा सत्ताधाऱ्यांनी घेतला तरी पुरेसा आहे.

Advertisement

महाराष्ट्राच्या राजकारणात आरोपांचे बॉम्ब नवे नाहीत. मात्र, काही बॉम्बचा आवाज काही दिवसांत विरतो, तर काहींचे पडसाद सत्तेची समीकरणे बदलणारे ठरतात. मनोज जरांगे-पाटील यांनी गुरुवारी समोर आणलेली ऑडिओ क्लिप हा असाच एक राजकीय स्फोट आहे. पाचशे कोटी रुपयांचा कथित व्यवहार, मराठा आरक्षण आंदोलन मोडून काढण्याचा आरोप आणि भाजप-शिवसेनेतील परस्पर संशय यामुळे हा विषय आता केवळ जरांगे विरुद्ध शिंदे एवढाच उरलेला नाही. महायुतीतील सत्तास्पर्धा, दिल्लीतील राजकीय शह-काटशह आणि महाराष्ट्रातील सत्ताकेंद्रांचे परस्परसंबंध या सगळ्यांची परीक्षा घेणारा हा संभाव्य भूसुरुंग ठरू शकतो.

बीडमधील नारायणगड येथील दसरा मेळाव्यात 20 ऑक्टोबरला जरांगे-पाटील यांनी पाचशे कोटी रुपयांच्या व्यवहाराचा आरोप केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या नेतृत्वाला आपल्याला शांत करण्यासाठी पाचशे कोटी रुपये दिल्याचे सांगितल्याचा दावा त्यांनी केला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून हा व्यवहार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यानंतर 22 ऑक्टोबरला पत्रकार परिषदेत सुमारे 32 मिनिटांच्या कथित ध्वनिमुद्रणातील काही भाग ऐकविला. या संभाषणात 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांना हाताळणे, त्यांच्या आंदोलनाची विश्वासार्हता कमी करणे आणि राजकीय पातळीवर त्यांना निष्प्रभ करण्यासंबंधी चर्चा असल्याचा दावा करण्यात आला. जरांगे यांनी या कटात शिवसेनेच्या नेत्यांचा 70 टक्के आणि भाजपच्या नेत्यांचा 30 टक्के सहभाग असल्याचा आरोप केला.

Advertisement

सत्तांतर आणि चौकशांचे राजकारण

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सत्तेवरील व्यक्तींना आरोपांच्या वादळाला सामोरे जावे लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. शिवाजीराव निलंगेकर-पाटील यांच्यावरील वैद्यकीय प्रवेशातील गुणांच्या फेरफाराचा वाद असो, ए. आर. अंतुले यांच्यावरील सिमेंट वाटपाचा वाद असो किंवा विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळातील विविध प्रशासकीय निर्णयांवरील प्रश्न असोत, आरोपांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले. अशोक चव्हाण यांना आदर्श सोसायटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रिपद सोडावे लागले. अजित पवार यांच्यावरील सिंचन प्रकल्पांशी संबंधित आरोप, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कथित वसुलीचे प्रकरण आणि आदित्य ठाकरे यांच्याशी संबंधित दिशा प्रकरणाचा आरोप-चौकशीच्या मागण्या, या प्रत्येकाची पार्श्वभूमी आणि कायदेशीर स्थिती वेगवेगळी आहे. या उदाहरणांतून एक बाब स्पष्ट होते. आरोप होणे, चौकशी सुरू होणे, राजकीय दबाव निर्माण होणे आणि न्यायालयीन किंवा तपासातील अंतिम निष्कर्ष लागणे या स्वतंत्र प्रक्रिया आहेत. अनेकदा चौकशीचा राजकीय परिणाम तत्काळ दिसतो; प्रत्यक्ष निष्कर्ष मात्र उशिरा लागतात किंवा आरोप सिद्ध होत नाहीत. त्यामुळे चौकशी म्हणजे दोषसिद्धी नव्हे, हेही तितकेच महत्त्वाचे.

दिल्लीतील शह-काटशहाचे पडसाद

महायुतीत भाजप हा प्रमुख सत्ताकेंद्र असला, तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व, त्यांची संघटनात्मक ताकद आणि मराठा समाजातील प्रभाव यांना दुर्लक्षून चालत नाही. सत्तेत सहभागी असतानाही आपले राजकीय महत्त्व टिकविण्याची प्रत्येक पक्षाची धडपड असते. केंद्रातील नेतृत्वाशी संबंध, राज्यातील मंत्रिपदे, निर्णयप्रक्रियेतील स्थान आणि आगामी राजकीय वाटचाल यांमधून ही स्पर्धा आकार घेत असते. या पार्श्वभूमीवर जरांगेंची ध्वनिफीत समोर येणे हा महायुतीतील परस्पर विश्वासाचा प्रश्न बनला आहे. एकनाथ शिंदे यांनी पाचशे कोटींचा आरोप फेटाळला आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी ध्वनिफितीची फॉरेन्सिक तपासणी आणि विशेष तपास पथकाची मागणी केली आहे. त्यांनी काही भाजपशी संबंधित व्यक्तींची नावेही घेतली आहेत. भाजपचे मंत्री आशीष शेलार यांनी ध्वनिफीत बनावट किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तयार केलेली असण्याची शक्यता तपासण्याची भूमिका घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सत्यता, आवाजांची ओळख आणि ध्वनिमुद्रणाच्या संदर्भाची तपासणी करण्याची भूमिका मांडली. त्यामुळे फडणवीस हे या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आले आहेत; त्याचवेळी तपासातून काय निष्पन्न होते, यावर त्यांची राजकीय भूमिका किती प्रश्नांच्या भोवऱ्यात येते, हे ठरणार आहे. शिंदे यांच्या शिवसेनेसमोरही मित्रपक्षावर विश्वास ठेवायचा की स्वत:च्या नेतृत्वाची प्रतिष्ठा जपण्यासाठी ठोस उत्तर मागायचे, असा पेच आहे.

भूसुरुंग कोणाच्या वाट्याला?

जरांगे-पाटील यांच्या आरोपांमागे नेमके काय आहे, हे तपासातूनच स्पष्ट होईल. ध्वनिफीत खरी निघाली, तर संभाषणातील व्यक्तींची जबाबदारी निश्चित करावी लागेल. ती बनावट किंवा फेरफार केलेली निघाली, तर ती तयार करून प्रसारित करण्यामागील हेतू शोधावा लागेल. दोन्ही परिस्थितींमध्ये निष्पक्ष चौकशी अपरिहार्य आहे. पण यातून सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्यात कशा पद्धतीचे राजकारण सुरू आहे आणि हे पक्ष आंदोलन कसे हाताळतात? संभ्रम कसा पसरवतात याविषयी आजपर्यंत केले जाणाऱ्या आरोपांना पुष्टी देण्याचे काम झाले आहे. राजकारणात बॉम्ब टाकणारे अनेकदा त्याच्या धक्क्यापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण प्रत्येक स्फोटाचा परिणाम केवळ लक्ष्यावरच होतो असे नाही; त्याचे तुकडे आसपासच्या सत्ताकेंद्रांनाही जखमी करू शकतात. जरांगेंचा हा ऑडिओ बॉम्ब महायुतीतील अविश्वास वाढविणारी ठिणगी ठरतो की आरोपांच्या राजकारणातील आणखी एक तात्पुरता गदारोळ, हे आगामी घडामोडी ठरवतील. या प्रकरणात कोणाला राजकीय फायदा होईल, यापेक्षा सत्य काय आहे हे अधिक महत्त्वाचे आहे. चौकशीचा वापर विरोधकांना अडकविण्यासाठी झाला, तर न्यायव्यवस्थेवरील विश्वासाला धक्का बसेल; आणि गंभीर आरोपांची चौकशीच झाली नाही, तर सत्तेच्या प्रभावाबाबत प्रश्न निर्माण होतील. म्हणूनच या प्रकरणाचा निकाल राजकीय सोयीने नव्हे, तर पुराव्यांनी लागला पाहिजे. आज पडलेला बॉम्ब उद्या कोणाच्या अंगणात फुटेल, हे सांगता येत नाही; मात्र, त्याच्या माऱ्यात सत्ताधारी महायुतीतील कोणते सत्ताकेंद्र सापडते, हे लवकरच स्पष्ट होईल. एक मात्र खरे, प्रत्यक्ष राजकीय पक्षाच्या धडाकेबाज कामगिरीपेक्षा बारभाईचा कारभार कसा थयथयाट करतो आहे, आणि बाजारबुणग्यांच्या उपद्वापामुळे सळसळते जिवंत राजकीय पक्ष कसे बदनाम होत आहेत याचे एक जिवंत उदाहरण सध्याच्या राजकारणात दिसू लागले आहे.

शिवराज काटकर

Advertisement
Tags :

.