कान भरण्याचे प्रयत्न कराल तर.., जरांगे पाटलांचा थेट CM Fadanvis यांना इशारा
ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करू नका
शिरोळ : मुख्यमंत्री फडणवीस यांनी ओबीसी संघटनेच्या नेत्यांची बैठक गोवा येथे घेऊन कान भरण्याचा प्रयत्न केला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करू नका. वेळ पडल्यास ओबीसी व मराठा समाज एकत्र येऊन तुम्हाला तुमची जागा दाखवू, असा इशारा मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.
येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आरपारची लढाई करण्यात येणार आहे. यासाठी शिरोळ येथील शिवाजी तक्तामध्ये घोंगडी बैठकीसाठी ते आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. जरांगे-पाटील म्हणाले, मराठा समाज आजअखेर शांततेत आंदोलन करीत आहे.
राज्यकर्त्यांनी याची दखल घेतली नसल्याचा आरोप करून कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील एक व्यक्ती या आंदोलनामध्ये सहभागी होणार असून मुंबईत पाय ठेवायला जागा मिळणार नाही.
ते म्हणाले, मुंबईपासून 50 किलोमीटरपेक्षा जास्त मराठा समाजाच्या रांगा लागतील, असे नियोजन करण्यात आले आहे. सरकारला या आंदोलनामुळे धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. पश्चिम महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत असून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आता आरपारची लढाई लढण्यात येणार आहे.
याकरिता सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. मनोज जरांगे-पाटील यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. स्वागत दीपक पाटील यांनी केले. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, जयश्री पाटील, दत्त कारखान्याचे संचालक दरगू गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. धनाजी चुडमुंगे, सागर धनवडे, दीपक गायकवाड, अभिजीत जगदाळे, राकेश जगदाळे, अमोल गावडे, एकनाथ माने यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.