Manoj Jarange Patil | विनाकारण माझ्या नादी लागू नका, अन्यथा.., जरांगे-पाटलांचा CM फडणवीसांना गर्भित इशारा
कोल्हापुर -आमच्या मराठा समाजाचं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं काही वैर नाही. मराठा समाजाशी वैर म्हणून त्यांनी वागू नये. आज आई अंबाबाईची पावित्र्य भूमी कोल्हापुरातून मुख्यमंत्र्यांना माझं हेच सांगणं आहे की आमचं-तुमचं वैर नाही. तुम्ही मराठ्यांवर अन्याय करून वैर ओढावून घेऊ नका. आता जर तुम्ही काम केलं नाही तर मराठ्यांचा रोष भयानक असेल, असा इशारा मराठा आंदोलक जरांगे-पाटील यांनी दिला आहे. आज ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी ते कालपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.
आज सकाळी मनोज-जरांगे पाटील यांनी करवीर निवासनी अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी न्यू पॅलेस येथे खासदार शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली. दरम्यान, माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यसरकार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी चांगलं काम करा करावे, राजकारणाची आम्हाला गरज नाही, मराठ्यांपुढे सरकारचं शहाणपण चालत नाही. देवेंद्र फडणवीस माझे वेगवेगळे विरोधक पुढे आणून काय करणार आहेत? तुम्ही माझ्यावर आरोप करता मात्र तुम्ही लोकांना काय दिलं? असा सवाल त्यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांवर टीका करताना पुढे ते म्हणाले, आपलेच असून माझ्यावर टीका करणार असाल तर लाज वाटते, मला तुम्हाला आमच्या समाजाचा म्हणण्याची. या लढ्यात यश येईल का नाही माहित नाही, मात्र लढत राहिले पाहिजे अशी माझी भूमिका आहे. माझ्या विरोधात कितीही टीका केली तर मी थांबणार नाही. समाजातील मुलांना अधिकारी झालेलं मला पहायचं आहे. त्यामुळं असं छक्के पंजे केलात तर तुमच्या हाताला कधीच लागणार नाही. तुमचा कधी न होणारा देव्हारा होईल. तुमचं न होणार वाटोळं माझ्या हातून होईल, त्यामुळे तुम्ही विनाकारण माझ्या नादी लागू नका, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
गॅझेटचा विषय टप्प्याने घेवूया
गॅझेटचा हा विषय आपण आधीपासूनच घेतला आहे. हैद्राबाद गॅझेट झालं आता सातारा गॅझेटचा विचार सुरू आहे. हळूहळू सगळ्याच गॅझेटचा विचार होणार असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. काही संकट अडचणी येतात, काही लोक आडवं पडणारी असतात. मात्र जिथे मिळतं तिथेच जाऊया, पण जरा दमान टप्प्याने जाऊया असंही ते म्हणाले.
खासदार शाहू साहेबांनी हाक द्यावी आणि आम्ही उभं रहावं
कोल्हापूर आपली राजगादी आहे हे मी कधीच विसरणार नाही. मी असं कधीच होऊ देणार नाही. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी हाक द्यावी आणि आम्ही उभ राहावं, अशीच माझी भूमिका आहे. म्हणूनच उपोषण संपल्या संपल्या लगेच त्यांना भेटायला आलो. आता सातारा गॅझेट घेत आहेत, कोल्हापूरबाबत पण अभ्यास सुरू आहे. खासदार शाहू महाराजांशी चर्चा करून त्यांच काय म्हणणं आहे हे सरकारला सांगू.
महायुती सरकारवर विश्वास बसलाय, मात्र...
याआधी सत्तेत असलेलं सरकार आम्हाला फसवलं, मात्र आता थोडासा विश्वास बसला आहे. सरकारने आतापर्यंत शासन निर्णय, 58 लाख कुणबी नोंदी प्रमाणपत्र वाटप, शिंदे समितीला मुदतवाढ, बळी गेलेल्या कुटुंबीयांना मदत, आंदोलनातील गुन्हे मागे घेतले यामुळे थोडासा विश्वास बसला आहे. विश्वास ठेवणं आमची जबाबदारी आहे, त्यामुळे याचा अर्थ वाटोळं केलं तरी शांत बसणार असा होत नाही. एखादी गोष्ट दिली तरी आभार मानणाऱ्यातला मी नाही. फसवलं तर सोडणार सुद्धा नाही. तुम्ही दगा फटका केला तर आंदोलन करण्याऐवजी आम्ही 2029 ची तयारी करू, आम्ही 100 टक्के हे सरकार पाडू, असंही ते म्हणालेत.