जपानचा ट्विटर किलर’ फासावर लटकला
सोशल मीडियाद्वारे 8 महिलांसमवेत 9 महिलांना फसवत केले ठार
वृत्तसंस्था/ टोकियो
जपानमध्ये शुक्रवारी एका गुन्हेगाराला फासावर लटकविण्यात आले आहे. 2017 मध्ये या गुन्हेगाराने 9 जणांची हत्या केली होती. या गुन्हेगाराला ‘ट्विटर किलर’ या नावाने ओळखले जात होते. तर गुन्हेगाराचे मूळ नाव ताकाहिरो शिराइशी होते. ताकाहिरो सोशल मीडियावर लोकांशी संपर्क साधून त्यांची हत्या करत होता. अशाप्रकारे त्याने 9 जणांची हत्या केली होती. तर जपानमध्ये तीन वर्षांमध्ये पहिल्यांदाच मृत्युदंडाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यापूर्वी 2022 मध्ये एका गुन्हेगाराला फासावर लटकविण्यात आले होते.
फ्लॅटवर बोलावून दाबत होता गळा
ताकाहिरो शिराइशीने 2017 साली टोकियोनजीक कनागावाच्या जामा शहरात स्वत:च्या फ्लॅटमध्ये बोलावून 8 महिला आणि एका पुरुषाची गळा दाबून हत्या केली होती. तो ट्विटरच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधायचा. मग त्यांना भेटण्यासाठी बोलावून त्यांची हत्या करायचा. यानंतर मृतदेहाचे तुकडे करून त्यांची विल्हेवाट लावत होता. सर्व लोकांशी त्याने ट्विटरद्वारे संपर्क साधला होता, याचमुळे ताकाहिरोला ‘ट्विटर किलर’ म्हटले जाते.
जपानचे न्यायमंत्री केसुके सुझुकी यांनी शिराइशीला फासावर लटकविण्याची अनुमती दिली होती. अत्यंत काळजीपूर्वक पडताळणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यात गुन्हेगाराच्या ‘अत्यंत स्वार्थी’ उद्देशाला विचारात घेण्यात आले आहे. ताकाहिरोने समाजाला मोठा धक्का दिला होता असे सुझुकी यांनी म्हटले आहे.