जपानच्या अॅबे भावंडांच्या ज्युडोतील दुहेरी सुवर्णाचे स्वप्न भंगले
वृत्तसंस्था/ पॅरिस
जपानसाठी सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये एकाच दिवशी ज्युडोमध्ये दोन सुवर्णपदके जिंकण्याचे अॅबे भावंडांचे स्वप्न यावेळी पूर्ण होऊ शकले नाही. चार वेळची विश्वविजेती उता अॅबे मागील पाच वर्षांत हरली नव्हती. पण तिला पॅरिसमधील तिच्या दुसऱ्याच लढतीत उझबेकिस्तानच्या दियोरा केल्डियोरोव्हाने पराभूत केले. पण तिचा थोरला भाऊ हिफुमी अॅबे याने ज्युडोतील किमान आणखी एक सुवर्णपदक आपल्या खात्यावर जमा होईल याची काळजी घेतली.
हिफुमी अॅबेने हिंसकपणे आपल्या अंतिम प्रतिस्पर्ध्याला तातामीवर फेकून देऊन त्याचे दुसरे ऑलिम्पिक ज्युडो सुवर्णपदक जिंकल्यानंतर तो उभा राहिला आणि त्याने थेट चॅम्प-डी-मार्स एरिनातील स्टँड्समधील रडत असलेल्या आपल्या बहिणीकडे पाहिले. ‘माझी बहीण आज हरली, त्यामुळे माझ्यासाठी हा दिवस खरोखरच कठीण होता. परंतु माझ्या मनात दिवसभर अशी भावना होती की, मला माझ्या बहिणीसाठी कठोर परिश्रम घ्यायचे आहेत’, असे हिफुमीने एका दुभाष्याद्वारे सांगितले. ‘हे कठीण आणि वेदनादायक होते. पण मी माझ्या भावनांवर अंकुश ठेवला आणि मला वाटले की, थोरला भाऊ या नात्याने माझी सर्वोत्तम कामगिरी करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता’, असे त्याने पुढे सांगितले.
हिफुमी अॅबेने पुऊषांच्या 66 किलो गटातील फायनलमध्ये ब्राझीलच्या विलियन लिमाचा पराभव केला. परंतु अॅबे भावंडांनी तीन वर्षांपासून जे लक्ष्य बाळगले होते तो दुहेरी विजय त्यांना साकारता आला नाही. दोघांनी त्यांच्या स्वगृही झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये एकाच दिवशी सुवर्णपदके जिंकली होती आणि दोघांनी 2021 पासूनच्या दोन जागतिक स्पर्धा जिंकल्या आहेत. पॅरिस गेम्समधून सुवर्णपदकांच्या आणखी एका जोडीसह मायदेशी जाण्याची संधी त्यांनी गमावली जेव्हा केल्डियोरोव्हाने 1-0 ने आघाडीवर असलेल्या अॅबेला तानी ओतोशी थ्रोच्या जोरावर नेत्रदीपक इप्पॉनची नोंद करत चकीत केले.
‘केल्डियोरोव्हाने एक उत्तम तंत्र राबवले’, असे उता अॅबेने जपानी माध्यमांना नंतर सांगितले. या पराभवामुळे ती बराच वेळ अस्वस्थ दिसली. 2019 पासून दोन्ही भावंडांना कोणत्याही स्पर्धेत पराभूत करता आले नव्हते. 24 वर्षीय उताचा 2016 नंतरचा हा केवळ दुसरा पराभव आहे. अॅबे भावंडांचा ऑलिम्पिक प्रवास मात्र संपलेला नाही. दोघांनी सांगितले की, त्यांना 2028 मधील लॉस एंजेलिस ऑलिम्पिकपर्यंत स्पर्धेत उतरायचे आहे.