जपानचे पंतप्रधान किशिदा यांचा राजीनामा
शिगेरु इशिबा होणार नवे पंतप्रधान
वृत्तसंस्था/ टोकियो
जपानमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी मंगळवारी स्वत:च्या मंत्रिमंडळासोबत राजीनामा दिला आहे. किशिदा यांनी 2021 मध्ये पदभार स्वीकारला होता, पक्षाला एक नवा नेता मिळावा म्हणून किशिदा हे पंतप्रधान सोडत आहेत. किशिदा यांचे सरकार घोटाळ्यांच्या आरोपांमुळे अडचणीत आले होते.
किशिदा यांच्यानंतर आता त्यांचे संभाव्य उत्तराधिकारी शिगेरु इशिबा हे पंतप्रधान होणार आहेत. इशिबा यांनी 27 ऑक्टोबर रोजी संसदीय निवडणूक करविण्याची योजना आखली आहे. ज्यानंतर त्यांना औपचारिक स्वरुपात पंतप्रधान म्हणून निवडले जाणार आहे.
नव्या प्रशासनाला लवकरात लवकर जनतेचा कौल मिळणे आवश्यक असल्याचे माझे मानणे असल्याचे इशिबा यांनी सोमवारी म्हटले होते. मतदानापूर्वी संसदेत स्वत:च्या धोरणांची तपासणीसाठी चर्चेसाठी इशिबा यांनी फारच कमी कालावधी दिल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. इशिबा यांना शुक्रवारी लिबरल डेमोक्रेटिक पार्टीच्या नेतेपदी निवडले गेले होते. किशिदा यांनी तीन वर्षांच्या कार्यकाळानंतर राजीनामा देणार असल्याची घोषणा ऑगस्ट महिन्यात केली होती.
इशिबा यांच्या लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचे संसदेत बहुमत असल्याने इशिबा पंतप्रधान होणार हे निश्चित आहे. जपानच्या कूटनीतिक भूमिकेपासून जगाला अनेक अपेक्षा आहेत. युक्रेनमध्ये रशियाने लादलेले युद्ध आणि मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जपानची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे किशिदा यांचे निकटवर्तीय आणि मुख्य कॅबिनेट सचिव हयाशी यांनी म्हटले आहे.