For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जपानला प्रचंड भूकंपाचा धक्का

06:48 AM Apr 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
जपानला प्रचंड भूकंपाचा धक्का
Advertisement

7.4 रिश्टर तीव्रता, पाठोपाठ मोठी सुनामी : अनेक इमारतींची तावदाने तुटली

Advertisement

वृत्तसंस्था / टोकियो

जपानच्या उत्तर भागात 7.4 रिश्टर तीव्रतेचा प्रचंड भूकंप झाला आहे. या भूकंपापाठोपाठ मोठी सुनामीही निर्माण झाली आहे. जपानच्या हवामान विभागाने उत्तर जपानच्या सागरतटावरील नागरिकांना सावधानतेची सूचना केली असून सुनामीमुळे साधारणत: 10 फूट उंचीच्या लाटा सागरतटावर आदळतील, अशी शक्यता वर्तविली आहे. या भूकंपामुळे जीवितहानी झाल्याचे वृत्त आतापर्यंत तरी देण्यात आलेले नाही. मात्र, अनेक इमारतींची तावदाने तुटल्याची माहिती आहे.

Advertisement

या भूकंपाच्या धक्क्यांचे पडसाद जपानची राजधानी टोकियोपर्यंत जाणवले आहेत. भूकंपक्षेत्रातील सर्व नागरिकांना त्वरित सुरक्षित स्थानी जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सुनामीमुळे सागरतटावर काही प्रमाणात हानी झाली आहे. एक लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थानी नेण्यात आले आले आहे.

बराच काळ सुनामी शक्य

या भूकंपाचे केंद्र जपानच्या उत्तरेला साधारणत: 25 किलोमीटर अंतरावर सागरतळाशी होते. त्यामुळे सुनामी निर्माण झाली आहे. सुनामीमुळे निर्माण झालेल्या मोठ्या लाटा बराच काळ सागरतटावर आदळत राहतील. त्यामुळे पुढील सूचना दिली जाईपर्यंत कोणीही सागरतटाजवळ जाऊ नये. तसेच सुरक्षित स्थानातून बाहेर पडू नये, अशी सूचना करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळातील जपानमधील हा सर्वात मोठा भूकंप आहे, अशी माहितीही प्रशासनाने दिली आहे.

आपदा निवारण समितीची स्थापना

भूकंपाची आणि त्यानंतर आलेल्या सुनामीची तीव्रता लक्षात घेऊन जपानच्या प्रशासनाने तातडीने आपदा निवारण समितीची स्थापना केली आहे. या भूकंपाची श्रेणी जपानच्या निकषाच्या अनुसार ‘अप्पर 5’ अशी असल्याचे स्पष्ट करण्यात आले. अधिक तीव्र भूकंपासाठी ही श्रेणी उपयोगात आणली जाते. या निवारण समितीने आपद्ग्रस्त भागात जाऊन प्रत्यक्ष आढावा घेणार असून त्यानंतर हानीचे प्रमाण लक्षात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

जपान भूकंपप्रवण क्षेत्रात

पृथ्वीवरील सर्वात मोठ्या भूकंपप्रवण क्षेत्रांमधील एका क्षेत्रात जपान स्थित आहे. त्यामुळे या देशात एका वर्षात जवळपास भूकंपाचे 1 हजार 500 धक्के बसतात. सर्व धक्के मोठे नसतात. तथापि, मोठ्या भूकंपातही कमीत कमी जीवित आणि  वित्तहानी व्हावी, असे तंत्रज्ञान जपानने विकसित केले आहे. जपानमधील गगनचुंबी इमारतीही कितीही मोठ्या भूकंपाचे धक्के सहन करतील अशाप्रकारच्या असतात. त्यामुळे मोठ्या भूकंपांमध्येही या देशात जीवितहानी नगण्य असते.

Advertisement
Tags :

.