श्रीराम फायनान्समध्ये ‘जपान’ची मोठी गुंतवणूक
एमयूएफजी बँकेची 39618 कोटींAची गुंतवणूक : 20 टक्के हिस्सेदारी
वृत्तसंस्था/ मुंबई
वित्तक्षेत्रातील कंपनी श्रीराम फायनान्समध्ये सर्वात मोठी विदेशी गुंतवणूक करण्यात आली आहे. जपानच्या एमयूएफजी बँकेने श्रीराम फायनान्समध्ये 20 टक्के इतकी हिस्सेदारी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता कंपनी 39618 कोटी रुपये मोजणार असल्याची माहिती आहे.
एमयूएफजी बँक ही जपानमधील मित्सूबीशी यूएफजे फायनान्शीयल समुहाची सहाय्यक कंपनी आहे. सदरच्या कंपनीने भारतातील श्रीराम फायनान्समध्ये केलेली गुंतवणूक परकीय गुंतवणुकीत पाहता सर्वाधिक मानली जात आहे. हिस्सेदारीअंतर्गत एमयूएफजी बँकेला 840 रुपये प्रति समभाग दराप्रमाणे 47 कोटी समभाग दिले जाणार आहेत. याचाच अर्थ एमयूएफजी बँक श्रीराम फायनान्समध्ये 20 टक्के इतकी हिस्सेदारी प्राप्त करणार आहे. यानंतर एमयूएफजी बँकेला श्रीराम फायनान्सच्या संचालक मंडळात दोन बिगर स्वतंत्र संचालक नेमण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे.
कंपनीची आर्थिक स्थिती सुधारणार
सदरच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावाला समभागधारकांची मंजुरी त्याचप्रमाणे नियामकाची मंजुरी व इतर अटी महत्त्वाच्या असणार आहेत. या गुंतवणुकीनंतर श्रीराम फायनान्सची आर्थिक स्थिती अधिक भक्कम होणार आहे. क्रेडीट रेटिंग चांगले असणार असून प्रशासकीय आणि कार्यालयीन कामकाज सुधारणार आहे.