जपानकडून हेरगिरी उपग्रहाचे प्रक्षेपण
वृत्तसंस्था / टोकिओ
जपानने आपल्या प्रथम हेरगिरी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. उत्तर कोरिया या देशाकडून असलेल्या धोक्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून या उपग्रहाची निर्मिती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. जपानच्या कागोशिमा येथील तानेगाशिमा अवकाश केंद्रातून या उपग्रहाचे प्रक्षेपण शुक्रवारी करण्यात आले.
या उपग्रहाला अवकाशात घेऊन गेलेल्या अग्निबाणाची निर्मिती जपानच्या मित्सुबिशी अवजड उद्योग कंपनीने केली आहे. उत्तर कोरिया किंवा अन्य कोणत्याही देशाकडून जपानवर वायुहल्ले किंवा क्षेपणास्त्र हल्ले करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याची माहिती हा उपग्रह असे हल्ले होण्यापूर्वीच देणार आहे. त्यामुळे अशा हल्ल्यांपासून संरक्षण करण्याची संधी जपानला मिळणार आहे.
दक्षिण कोरियामुळे सावधानता
काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर बाँब आणि क्षेपणास्त्रे डागली होती. ती निर्मनुष्य भागांमध्ये पडल्याने हानी झाली नव्हती. तथापि, भविष्यकाळात उत्तर कोरियाकडून असे हल्ले जपानवरही होऊ शकतात अशी माहिती मिळाल्याने जपानने हे पाऊल उचलले आहे. जपानवर वायू हल्ला किंवा क्षेपणास्त्र हल्ला झाल्यास शत्रूची विमाने अगर क्षेपणास्त्रे जपानपर्यंत पोहचण्यापूर्वीच त्यांचा विनाश करण्याची संधी या उपग्रहामुळे जपानला मिळणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले.