जपानच्या हाती लागला मोठा खजिना
दुर्लभ खनिजांच्या साठ्यांचा शोध : चीनचा दबदबा संपुष्टात येणार
वृत्तसंस्था/ टोकियो
जपानने 23 कोटी टन मॅगनीजच्या साठ्याचा शोध लावल आहे. मॅगनीजचा वापर इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी आणि स्मार्टफोन निर्मितीत विशेष स्वरुपात केला जातो. टोकियो विद्यापीठ आणि निप्पॉन फौंडेशनच्या संशोधकांनी टोकियोपासून सुमारे 1200 मैल अंतरावरील मिनामी-तोरीशिमा बेटावर या साठ्याचा शोध लावला आहे. संशोधकांनुसार पाण्याखालील खनिज क्षेत्रात 7,40,000 मेट्रिक टन निकेल आणि 6,10,000 मेट्रिक टन कोबाल्टचा देखील साठा आहे.
75 वर्षांपर्यंत गरजा पूर्ण होणार
निकेलचा विशाल साठा जपानसाठी पुढील 11 वर्षे तर कोबाल्टचा साठा 75 वर्षांपर्यंतची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे. निकेल आणि कोबाल्टचा वापर ऊर्जा साठवणूक, खासकरून लिथियम आयर्न बॅटरीच्या निर्मितीकरता केला जातो. या साठ्याला वर्तमान बाजारमूल्यावर विकल्याचे याचे मूल्य 26 अब्ज डॉलर्स होण्याचा अनुमान आहे.
अत्यंत आवश्यक खनिजं
कोबाल्ट रिचार्जेबल बॅटरीसाठी अत्यंत आवश्यक आहे. मॅगनीजसोबत हे दोन्ही धातू इलेक्ट्रिक वाहनात वापरण्यात येणाऱ्या लिथियम आयर्न बॅटरीच्या तंत्रज्ञानासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. जपान ऊर्जेच्या नव्या स्रोतांच्या शोधासाठी वेगाने काम करत आहे. अमेरिका आणि अन्य देश देखील टंगस्टन, मॅगनीज आणि दुर्लभ पृथ्वी तत्व म्हणजेच दुर्लभ धातू आणि खनिजांच्या नव्या स्रोतांचा शोध घेत आहेत. यापैकी अनेक धातू अन् खनिजांच्या पुरवठ्यावर सध्या चीनचे नियंत्रण आहे.
चीनची मक्तेदारी मोडीत निघणार
अमेरिकन जियोलॉजिकल सर्वेच्या अहवालात चीनच्या कोबाल्ट प्रभुत्वाला एक प्रमुख पुरवठा साखळी जोखीम ठरविण्यात आले आहे. महत्त्वपूर्ण खनिज निर्यात बंदी बिगर चिनी बॅटरी उत्पादक आणि वापरकर्त्यांसाठी गंभीर आव्हाने निर्माण करु शकते असा इशारा या अहवालात देण्यात आला आहे. दुर्लभ पृथ्वी तत्वांकरता मक्तेदारी निर्माण करत चीनने याचा अन्य देशांच्या विरोधात वापर केला आहे.