For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

जंतर मंतर छू मंतर

06:41 AM Oct 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
जंतर मंतर छू मंतर
Advertisement

काही वर्षांपूर्वी आग्य्dरामध्ये एका जागतिक कीर्तीच्या जादूगाराचा एक कार्यक्रम झाला होता. तेव्हा हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत त्याने ताजमहालच गायब करून दाखवला होता. असे काही होईल याचा अजिबात थांगपत्ता नसलेल्या प्रेक्षकांना तो एक जबर धक्का होता. त्या जादूगाराने काय हातचलाखी केली वा कोणती संमोहन विद्या वापरली त्याचे तोच जाणे. पण त्यादिवशी त्याने आग्रा जिंकले हे मात्र खरे. गेल्या आठवड्यात मोदी सरकारने नवी दिल्लीमधील ऐतिहासिक जंतर मंतरच विरोध प्रदर्शनाकरता गायब करून दाखवले. पण या धक्क्याने देशभर सरकारची जी निंदानालस्ती झाली ती अलीकडील काळात एव्हढ्या मोठ्या प्रमाणात खचितच झाली असेल.

Advertisement

विरोधकांच्या विरोध प्रदर्शनांचा या सरकारने एव्हढा धसका घेतला आहे की त्याकरता कोणत्याही थराला जायची त्याची तयारी आहे, असेच त्यावरून दिसून येत आहे. जिथे सोनाराचा हातोडा वापरून काम होत असेल तिथे देखील लोहाराचा घण वापरायची या सरकारला सवय झाल्याने त्याची प्रत्येकबाबतीत एक वेगळीच फजिती होत आहे. बुलडोझर या सरकारचे प्रतिक झालेला आहे आणि त्याला वाकुल्या दाखवायला विरोधकांना मजा येत आहे.

काँग्रेस सरकारात असताना गृह सचिव असलेले जी के पिल्ले यांनी दिल्लीतील आण्णा आंदोलन आणि रामदेव यांचे आंदोलन असताना सरकार कसे समजदारीने वागले होते असे सांगून कोणत्याही बाबतीत निषेध आणि प्रदर्शने करण्याचा अधिकार नागरिकांना घटनेने दिलेला आहे आणि अशी आंदोलने करताना काही वेडेवाकडे होणार नाही ना, याचीच फक्त खबरदारी पोलीस दलाने घ्यायची असते असे निक्षून सांगितले. पण आजच्याघडीला जे पोलीस दल आहे ते आपले काम ठीक करत नाही असेच दिसत आहे असे स्पष्ट केले.

Advertisement

जंतर मंतर बंद केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून त्याच्या जवळच असलेल्या कॅनॉट प्लेस या सेंट्रल दिल्लीच्या दिमाखदार बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये ‘लहराओ तिरंगा’ हे अभियान छेडून विरोधकांनी एक आगळेच आव्हान मोदी आणि अमित शहा यांना दिलेले आहे. कॅनॉट प्लेसमध्ये बरेच रस्ते येऊन मिळत असल्याने हे एक आगळेच आव्हान आहे. त्यातच बरेच दिवस ‘शांत’ असलेल्या शहा यांनी विरोधकांनी कितीही आकांडतांडव केला तरी 2029च्या लोकसभा निवडणूकीत भाजपच परत विजयी होणार आहे असा दावा करून गैरभाजप पक्षांना केवळ सावधच केलेले नसून त्यांच्यातील एकजूट वाढवण्याचे काम केलेले आहे. काँग्रेस आणि कॉक्रोच जनता पार्टीमधील दूरी हळूहळू कमी होत असल्याचे दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे भारत ही ‘जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे’ असे गौरवोदगार काढत आहेत तर दुसरीकडे त्यांचे सरकार आकाशपाताळ एक करून विरोधकांना चूप करण्याचे राजकारण खेळत आहे. हा विरोधाभास लोकांपासून लपून राहिलेला नाही. नवी दिल्लीला छावणीचे स्वरूप दिल्याने तिथे एव्हढे बॅरीकेड उभारले गेले आहेत की सारी राजधानी एक प्रकारे अडथळ्यांची शर्यत झालेली आहे. विरोधकांच्या विरोध प्रदर्शनात भाग घेण्याकरता देशाच्या विविध भागातून लोक स्वखर्चाने नवी दिल्लीत पोहोचत आहेत असे अजब चित्र दिसत आहे. तीस वर्षे अशा आंदोलनाचे ठिकाण असलेल्या ‘जंतर मंतर’ला बंद केल्याने आगडोंब उसळला नसता तरच नवल होते. जी आता तीन ठिकाणे अशा धरणे-प्रदर्शनाकरता खुली केलेली आहेत त्यापैकी रामलीला मैदान हे वर्षातील बराच काळ कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाकरता राखीव ठेवले जाते तर इतर दोन ठिकाणे संसदेपासून इतकी दूर आहेत की तिथे फारसे कोणी जाण्याची अजिबात शक्यताच नाही असे जाणकार सांगतात. लोकांनी आंदोलनच करू नये आणि मुक्या बिचाऱ्या जनावरांसारखे गप्प राहावे असे सरकारला वाटते असे त्यांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयावर काढलेला मोर्चा प्रचंड होता असे त्यांचे टीकाकार देखील कबूल करत आहेत तर अभिजीत दिपके आणि त्यांच्या साथीदारांना अटक करूनदेखील ‘लहराओ तिरंगा’ ला हजारोंचा प्रतिसाद लाभून दिल्ली पोलीस आणि सरकारचेच नुकसान झाले. अमित शहा यांची रणनीती सरकारला जास्तच संकटात टाकत आहे असे आता दिसू लागले आहे. ठेच लागून शिकणारे/ शहाणे होणारे केंद्रातील सत्ताधारी नसल्याने ते विरोधकांचीच जास्त मुस्कटदाबी करण्यासाठी दडपशाही वाढवतील अशी भीती देखील राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. इंदिरा गांधी यांनी 1975 साली लावलेल्या आणीबाणीबाबत नेहमी आकांडतांडव करणारे हे सरकार त्यापेक्षादेखील भयानक पावले उचलायला मागेपुढे पाहणार नाही अशी विरोधकांची भावना आहे. ती किती बरोबर अथवा चूक ते येणारा काळ दाखवेल.

जेन झीची सरकारवरील चीड अशावेळी वाढलेली आहे की ज्यावेळी भाजपच्या नॅरेटिव्हचे शेल्फ लाईफ संपलेले दिसत आहे. हिंदू-मुस्लिम तेढ वाढवून मोदी-शहा यांनी गेली 12 वर्षे आपली खळगी भरली खरी पण आमच्या हाती काहीच लागले नाही अशी भावना तरुण पिढीची झालेली आहे. अशावेळी सत्ताधाऱ्यांचा कोणताच प्रचार-अपप्रचार आपला ठसा उमटवत नाही आहे असे दिसून येत आहे. सामाजिक मीडियावरील प्रभूत्वाने मोदींनी हस्तगत केलेली सत्ता आता नाजूक काळात पोहोचली आहे. कारण या मीडियावर विरोधकांची छाप वाढलेली आहे. मोदींनी पोसलेली गोदी मीडियादेखील आपली परिणामकारकता घालवून बसलेली आहे कारण ते सरकारचे ‘भोम्पू’ आहेत असा समज वाढीस लागलेला आहे. त्यामुळे खऱ्या माहिती/बातमीसाठी त्यांनी यू ट्यूब वरील पत्रकारांच्या खाजगी चॅनेलकडे मोर्चा वळवला आहे. पंतप्रधान इंस्टाग्रामवर अॅक्टिव्ह झालेले असले तरी तरुण पिढीशी त्यांचा संवाद होत आहे असे दिसत नाही. पंतप्रधानांनी दुष्यन्त गौतम या वादग्रस्त भाजप नेत्याला सिक्कीमचा राज्यपाल बनवून एक वाद उठवला आहे. त्यांच्या नेमणूकीने अंकिता भंडारीच्या खुनावरील राजकीय वाद उत्तराखंडमध्ये पुन्हा उफाळून आलेला आहे. 6 महिन्यांनी उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणूका आहेत आणि गौतम यांच्या नेमणूकीने विरोधकांना मोठा मुद्दा मिळालेला आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन संपून 65 दिवस झाले तरी हे अधिवेशन सरकारकडून तहकूब केले नाही. यावरून त्यांच्या मनात काहीतरी काळेबेरे आहे असे विरोधकांना भासत आहे.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :

.