ड्रॅगन्सच्या विजयात जान्सेनची हॅट्ट्रिक
वृत्तसंस्था/राऊरकेला
2025 च्या हॉकी इंडिया लीग स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात जान्सेनच्या शानदार हॅट्ट्रीकच्या जोरावर तामिळनाडू ड्रॅगन्सने गोनासिकाचा 6-5 अशा गोल फरकाने निसटता पराभव केला. या सामन्यातील विजयामुळे तामिळनाडू डॅगन्सने स्पर्धेच्या गुणतक्त्यात दुसरे स्थान मिळविताना 4 सामन्यांतून 9 गुण नोंदविले आहेत. या सामन्यात दोन्ही संघांकडून आक्रमक खेळावर अधिक भर दिला गेला होता. गोनासिकाने पाचव्याच मिनिटाला खाते उघडले. अर्जित सिंग हुंडालने हा गोल केला. दहाव्या मिनिटाला अर्जित सिंगने गोनासिकाचा दुसरा गोल केला. तामिळनाडू डॅगन्सचा पहिला गोल 15 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर जान्सेनने केला.
सामन्याच्या दुसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत जान्सेनने पाठोपाठ मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या कॉर्नरवर त्याला गोल करता आला नाही. पण दुसऱ्या कॉर्नरवर त्याने ड्रॅगन्सचा गोल करुन संघाला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. 43 व्या मिनिटाला वॉर्करने ड्रॅगन्सचा तिसरा गोल नोंदविला. गोनसालिकाने आणखीन दोन गोल करत ड्रॅगन्सवर 4-3 अशी आघाडी 45 व्या मिनिटाला मिळविली. शेवटच्या 15 मिनिटांच्या कालावधीत जान्सेनने आपला तिसरा गोल नोंदवित ड्रॅगन्सला 4-4 अशी बरोबरी साधून दिली. 55 व्या मिनिटाला ड्रॅगन्सचा पाचवा गोल नोंदविला गेला. सामना संपण्यास 2 मिनिटे बाकी असताना डॅगन्सने आपला सहावा गोल नोंदविला. अखेर गोनासिकाला हा सामना केवळ एका गोलाच्या फरकाने गमवावा लागला.